कंत्राटदारावरून स्थायी समितीत मतभेद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

वाशीतील जलउंदचन केंद्रे आणि जलवितरण व्यवस्थेचे परिचालन करणे तसेच देखभाल-दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर स्थायी समिती सदस्यांचे एकमत न झाल्यामुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.

नवी मुंबई - वाशीतील जलउंदचन केंद्रे आणि जलवितरण व्यवस्थेचे परिचालन करणे तसेच देखभाल-दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर स्थायी समिती सदस्यांचे एकमत न झाल्यामुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.

महापालिकेने मागवलेल्या निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने माघार घेतल्यामुळे दुसऱ्या पात्र कंत्राटदाराला काम देण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले होते; मात्र त्यानेही निविदेत रक्कम भरताना चुकीची रक्कम भरल्यामुळे अखेरचा निर्णय स्थायी समितीने घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी प्रस्ताव सादर केला होता; परंतु प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या कंत्राटदारावर सर्व सदस्यांचे एकमत न झाल्यामुळे अखेर हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला. 

एस. पी. कन्स्ट्रक्‍शनने निविदेत चार कोटी 79 लाख 50 हजार इतकी रक्कम भरली. ऑनलाईन निविदेत कमी रक्कम भरताना चुकीची 47 कोटी 95 लाख रक्कम भरण्यात आली. ही चुकून भरलेली रक्कम कंत्राटदाराच्या लक्षात आल्यावर त्याने प्रशासनाला पत्र देऊन आपण हेच काम चार कोटी 78 लाख 71 हजार रुपयांत करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे एस. पी. कन्स्ट्रक्‍शन यांना काम देण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले होते. 

हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आल्यानंतर प्रस्तावाला मंजुरी दिल्यास पात्र असलेला दुसरा कंत्राटदार कोर्टात जाऊन आपल्याला अडचणीत आणेल, असा निर्वाणीचा इशारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सलुजा सुतार यांनी विरोध केला. त्याला शिवसेनेच्या नगरसेविका सरोज पाटील यांनीही पाठिंबा देत चुकीची रक्कम भरणाऱ्या कंत्राटदाराला काम देण्यास नकार दिला. स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनी या दोन्ही कमी निविदा रक्कम असलेल्या तिसऱ्या ए. के. इलेक्‍ट्रिकल्सला काम देण्याचे मत व्यक्त केले; परंतु त्याला इतर सदस्यांनी विरोध केल्यामुळे नेमके काम कोणाला द्यायचे, यावर एकमत होत नसल्याने अखेर हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Controversy in Standing Committee from Contractor