सलग चौथ्या दिवशी कोथिंबिरीची शंभरीच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

घाऊक आणि किरकोळ बाजारात चार दिवसांपासून कोथिंबीर महागलेलीच आहे. रविवारीही बाजारात कोथिंबिरीचा भाव 100 रुपयेच होता. 

मुंबई - घाऊक आणि किरकोळ बाजारात चार दिवसांपासून कोथिंबीर महागलेलीच आहे. रविवारीही बाजारात कोथिंबिरीचा भाव 100 रुपयेच होता. लहान जुडीही किरकोळ बाजारात 50 रुपयांना विकली जात आहे. 

राज्यभर पाऊस सुरू असल्याने भाजीपाला भिजतो. कोथिंबीर भिजली की जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे ती महाग झाली आहे, अशी माहिती प्लाझा भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी दिली. नाशिक येथून कोथिंबीर बाजारात येते. घाऊक बाजारात मोठी जुडी 100 रुपयांना विकली जात आहे; पण किरकोळ बाजारात याच जुडीची अर्धी जुडी 100 रुपयांना आहे. 50 रुपयाला एकवेळच्या वापरापुरती जुडी मिळते. त्यामुळे गृहिणींनी रोजच्या स्वयंपाकातून कोथिंबिरीचा वापर कमी केला आहे. 

हॉटेलमध्ये कोंथिबीर वडी मिळत असली, तरी अद्याप तिचे दर स्थिर आहेत; मात्र भाववाढीचा फटका हॉटेलचालकांना पडत आहे. पोळीभाजी केंद्रावर कोंथिबिरीचा वापर कमी झाला आहे. ती महाग असली, तरी काही पदार्थांत वापरावी लागते. त्यामुळे होलसेल मार्केटमधून एकाच परिसरातील तीन-चार स्टॉलवाले एकत्र कोथिंबीर विकत घेतात. त्यामुळे फटका कमी बसतो, असे माझगाव येथील पोळीभाजी विक्रेत्या कल्पिता जुईकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coriander rate was Rs 100