ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच! 24  तासांत 190 बाधित

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 11 May 2020

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई पालिका क्षेत्रात 24 तासांत तब्बल 105 नवे कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील संख्या झपाट्याने वाढली आहे.

ठाणे : सोमवारी (ता.11) ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई पालिका क्षेत्रात 24 तासांत तब्बल 105 नवे कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्यातील संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच नवी मुंबईमध्ये 4 जणांच्या मृत्यूची देखील नोंद करण्यात आली आहे. याऊलट ठाणे पालिका क्षेत्रात बाधितांची संख्या आटोक्यात असली तरी,  तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारी एका दिवसात 190 रुग्णांची तर,  9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 2 हजार 378 वर पोचला असून मृतांचा आकडा 67 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एकट्या ठाणे पालिका क्षेत्रात एका दिवसात 100 रुग्ण बरे देखील झाले आहेत.

Lockdown : अंध व्यक्तीचे गृहस्वप्न पूर्ण होणार? न्यायालयाचा दिलासा

सोमवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 105 रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या 779 इतकी झाली असून मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. तर,  ठाणे पालिकाक्षेत्रात 40 कोरोनाबाधीतांची नोंद व तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 752 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे. उल्हानगरमध्ये देखील 9 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधीतांचा आकडा 47 झाला असून मृतांचा आकडा 3 झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत 23 नव्या रुग्णांसह तेथील बाधितांचा आकडा 344 इतका झाला. मीरा-भाईंदरमध्ये एका नवी रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण बाधितांची संख्या 257 इतका झाली आहे. भिवंडी पालिका क्षेत्रात, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये प्रत्येकी 2 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा अनुक्रमे 27, 56 आणि 16 इतका झाला आहे. तर,  ठाणे ग्रामीण भागात 6 नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील बाधितांचा आकडा 100 वर गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona continues in Thane district! 190 interrupted in 24 hours