ठाण्यात आरोपीच करत होता सुरक्षा रक्षकाचे काम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

ठाणे - पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना अमरावती तुरुंगातून पॅरोलवर बाहेर येऊन फरारी झालेल्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट- 1 च्या पथकाने तब्बल 23 वर्षांनंतर बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे तो ठाण्यात सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. सुरेश गुलाबराव ढोले (54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ठाण्यातील एका बांधकाम साईटवर सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता. त्यास वागळे इस्टेट परिसरातून पोलिसांनी अटक केली. या आरोपीवर यवतमाळ जिल्ह्यातील नेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. 

हेही वाचा - कोरोनाच्या धास्तीमुळे सॅनिटायझरचा तुटवडा

यवतमाळ जिल्ह्यातील नेर परिसरात आरोपी सुरेश ढोले याच्यावर त्याची पत्नी कल्पना हिच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात सुरेश याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान, अमरावती मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत असताना तो 28 दिवसांच्या पॅरोल सुट्टीवर तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा तुरुंगात हजरच झाला नाही. याप्रकरणी नेर पोलिस ठाण्यात आरोपी सुरेश ढोले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारागृहातून सुट्टीवर आलेला आरोपी फरार झाल्याने यवतमाळ पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाला संपर्क केला.

हेही वाचा - मेट्रो ४ चे काम 'या' कारणामुळे थंडावले

युनिट-1 च्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज कुराडे यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे फरारी आरोपी सुरेश ढोले याला ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे अंबिकानगर येथून ताब्यात घेतले. ठाण्यात माजिवडा येथील एका कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या साईटवर सुरेश हा सुरक्षा रक्षकांचे काम करीत होता. अधिक तपासासाठी त्याला नेर पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

web title : The criminal was doing security guard job


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The criminal was doing security guard job