धक्कादायक! ठाण्याच्या आरोग्य विभागातच कोरोनाचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 मे 2020

  • आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव
  • ठाणे महापालिका मुख्यालयातील कार्यालय 24 तास बंद

ठाणे ः शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. त्यातच सामान्यांसह पोलिस, प्रसारमाध्यमे, वैद्यकीय सेवा, महापालिका अधिकारी यांच्यासह आता कोरोनाने थेट महापालिका मु्ख्यालयात शिरकाव केला आहे. महापालिका मुख्यालयाच्या चैाथ्या मजल्यावर कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे हे कार्यालय 24 तासांसाठी बंद करण्यात आले आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर पाच कर्मचाऱ्यांना घरातच क्वॉरन्टाईन केले असून त्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा आटला! लॉकडाऊनमुळे रक्तदानाची गरज वाढली

ठाणे महापालिका परिसरात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत असलेले कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयातील परवाना विभागातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता मुख्यालयातील चवथ्या मजल्यावरील आरोग्य विभागही आता अडचणीत आला आहे. सध्या याच विभागातून शहरातील कोरोना विषयीची माहिती, आढावा घेतला जात आहे, परंतु आता याच विभागातील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला लिपीक असून ती कल्याण शहरात राहते. अशक्तपणा तसेच प्रकृती ठिक नसल्यामुळे शुक्रवारपासून ती कामावर येत नव्हती. त्यामुळे तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल बुधवारी आला असून त्यात तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 

कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या चार ते पाच कर्मचाऱ्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाचे कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढील 24 तास बंद करण्यात आले आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona enter in Thane health department