esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

water scarcity

नवी मुंबई: एमआयडीतील कंपन्यांच्या उत्‍पादनात घट; पाण्यावाचून उद्योजकांचे हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : गेले दीड वर्ष कोरोनामुळे (corona) आर्थिक संकटात (financial crisis) सापडलेल्या नवी मुंबईतील (navi Mumbai) टीटीसी औद्योगिक (TTC Industries) क्षेत्रावर आता पाणीटंचाईचे संकट (water scarcity) कोसळले आहे. पाणी पुरवठ्याअभावी अनेक उद्योगांतील कामकाज ठप्प होण्याची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमध्ये (companies) पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे (water problem) कामगारांना घरून पाण्याच्या बाटल्या भरून आणाव्या लागतात. तर अनेक कंपन्यांनी पाण्याअभावी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावणे टाळले आहे.

हेही वाचा: तळ्याची विटंबना करणाऱ्या तिघांना अटक

पाण्याअभावी उत्‍पादनावरही परिणाम झाला असून अनेक कंपन्यांचे उत्‍पादन निम्‍म्‍यावर आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून नवी मुंबई एमआयडीसी परिसर ओळखला जातो. एमआयडीसीत जवळपास ४, ५०० कंपन्या आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) दररोज या क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. काटई ते शिळफाट्यापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे दर शुक्रवारी पाणीपुरवठा बंद केला जातो. मात्र, गेल्‍या आठवड्यात गुरुवारी रात्रीपासूनच हा पुरवठा बंद करण्यात आला होता, तर शनिवारी शिळफाटा येथे जलवाहिनी फुटली. रविवारी अंबरनाथ येथे जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम नवी मुंबईतील उद्योगांवर झाला. मंगळवारी पुन्हा डोंबिवली जवळ जलवाहिनी नादुरुस्त होण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पुन्हा औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.

टीटीसी ओद्योगिक क्षेत्रात जवळपास पाच लाख कर्मचारी काम करतात. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून या क्षेत्रात पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कामगारांना घरूनच पाण्याच्या बाटल्या घेऊन येण्यास सांगितल्या होते. पाणी नसल्याने कंपन्यांची साफसफाई झाली नाही. तर काही उद्योजकांनी कामावर आलेल्‍या कामगारांना पुन्हा घरी जाण्यास सांगितले. महिला कामगारांचे यात सर्वाधिक हाल झाले. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आली. पाणी नसल्याने वस्तू उत्पादनावरही परिणाम होत आहे. पाण्याशिवाय उत्पादन शक्य नसल्याने काही कंपन्यांनी ३ ते ४ हजार रुपये खर्च करून बाहेरून टँकर मागविल्‍याचे उद्योजक सांगतात.

हेही वाचा: स्वत:मुळे वीज टंचाईचे संकट ओढवल्याचे राऊत यांनी मान्य करावे- अतुल भातखळकर

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातही गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याचे समोर आले आहे. त्याचा थेट फटका उद्योगांना बसला असून कंपन्यांचे उत्पादन निम्‍म्‍यावर, ५० टक्क्यांवर आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा पुरवठा होत नसल्याने कंपन्यांना मोठा फटका बसत असून एमआयडीसी प्रशासनाचे नियोजनशून्य, ढिसाळ कामाचा फटका कंपन्यांना बसत असल्‍याचा आरोप काही उद्योजकांनी केला आहे. येत्या काही दिवसांत दिवाळी आहे. त्या पार्श्वभूमीवर कामाचा वेग वाढवला आहे, मात्र एमआयडीसीच्या कारभारामुळे कंपन्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

एमआयडीसीकडून जलवाहिनी दुरुस्‍तीच्या कामास विलंब लागला. आणि त्‍याचा फटका उद्योजकांना बसल्‍याचे खरे आहे. पण सद्यःस्थितीत पाणी पुरवठा सुरू झाला आहे. कमी दाबाने पाणी येत असल्‍याने उंचावरील भागांत पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत. मात्र पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्‍यास सर्वांना पाणी मिळेल, असे एमआयडीसीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

loading image
go to top