कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक; दररोज सरासरी 500 रुग्ण; डोंबिवली पूर्वेला ताप वाढला

रविंद्र खरात
Friday, 18 September 2020

कल्याण आणि डोंबिवली शहरात दररोज सरासरी 500 कोरोना बाधित अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सर्वात अधिक  रुग्ण संख्या डोंबिवली पूर्वमध्ये आहे.

कल्याण: कल्याण आणि डोंबिवली शहरात दररोज सरासरी 500 कोरोना बाधित अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सर्वात अधिक  रुग्ण संख्या डोंबिवली पूर्वमध्ये आहे.

मुंबईकरांची कडक उन्हामुळे होरपळ? तर जाणून घ्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वातावरणाची स्थिती

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर  ठाण्या पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरात सरसकट दुकाने सुरू झाली. त्यामुळेच या दोन्ही शहरात पुन्हा कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे .
कोरोना बाधित रुग्णाची संख्या गुरूवार (ता.17) पर्यंत 37 हजार 240 आहे. यात 5 हजार 318 रुग्ण उपचार घेत असून 31 हजार 172 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार दरम्यान 750 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 रुग्ण संख्येची माहिती घेतली असता डोंबिवली पूर्वेला सर्वाधिक 10 हजार 837 रुग्ण आहेत. त्यानंतर कल्याण पश्चिमेला 10 हजार 411 रुग्ण होते.  कल्याण पूर्वेला 7 हजार 29 रुग्ण आणि डोंबिवली पश्चिमेला 6 हजार 45 रुग्ण आढळून आले. मांडा टिटवाळा 1 हजार 478, मोहना 1 हजार 236 रुग्ण आहेत.  तर सर्वात कमी पिसवली 204 रुग्ण आढळून आले आहेत .

आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट, कलम १४४ लागू झाल्यानंतर म्हणालेत घाबरू नका

चाचण्यांची संख्या वाढवली
लॉकडाऊन शिथिल झाल्यावर दुकाने , बाजार पेठ खुल्या झाल्या असून नागरिक बाहेर पडत आहेत. कामावर जात आहेत. त्यासोबत कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढ होत असून सुविधा आणि उपचार करण्यात पालिका प्रशासन सज्ज असल्याचा दावा पालिकेने केला आहे .

दंडात्मक कारवाईचा उपाय
कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने मास्क न लावणे , रात्री 7 नंतर दुकाने सुरू ठेवणे यांच्या विरोधात मोहीम उघडली असून प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कारवाई करत 13 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे .

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona in Kalyan Dombivali An average of 500 patients per day