महत्वाची बातमी : वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

  • भीतीपोटी अनेक सोसायट्यांनी आपले वृत्तपत्र बंद केले
  •  अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन, डॉ. प्रदीप आवटे यांची माहिती;

मुंबई : घरी येणाऱ्या वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वृत्तपत्रातून कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी अनेक सोसायट्यांनी आपले वृत्तपत्र बंद केले आहेत; मात्र वृत्तपत्रातून कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार होणे शक्‍य नसल्याचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कारवाईला सुरवात, उद्यापासून ऑफिसेसवर पडणार धाडी

महाराष्ट्रात कोरोना सध्या नियंत्रणात आहे. हा आजार आपल्याकडे उद्भवला नसून परदेशातून आलेल्या लोकांच्या माध्यमातून हा आजार भारतात आला. त्यातील बाधित रुग्णांकडून हा संसर्ग होण्याची शक्‍यता असते. परदेशातून न आलेल्या आणि बाधित नसलेल्या लोकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा संसर्ग हवेतून पसरत नाही, तसेच इतर वस्तूंवर हा विषाणू फार काळ जिवंत राहत नाही. त्यामुळे वृत्तपत्रांच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणे शक्‍य नसल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. आपण आपली जितकी काळजी घेतो, ती पुरेशी असल्याचेही ते म्हणाले. 

Well said, Doctor! डॉक्टरांच्या "त्या" कॅम्पेनचे मोदींकडून कौतुक!

कोरोना संसर्गाच्या बाबतीत समाजमाध्यमांवर अनेक अफवांना ऊत आला आहे. अशा अफवांमुळे कोरोनाबाबत लोकांच्या मनात असणारी भीती अधिक वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचे विषाणू वृत्तपत्रातून पसरत असल्याची पोस्ट समाज माध्यमांवर पसरवण्यात आली. त्यामुळे काही लोकांनी तसेच सोसायट्यांनी त्यांच्याकडील वृत्तपत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वृत्तपत्र वितरक, तसेच विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मते, वृत्तपत्रातून हा संसर्ग पसरण्याची शक्‍यता नसल्याने लोकांनी वृत्तपत्र नेहमीप्रमाणे मागवावेत, तसेच नियमित वाचावेत आणि यातून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona is not infected with newspapers!