ठाण्यात कोरोना रुग्ण हजारांच्या पार, जिल्ह्यात 289 नवीन रुग्ण !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शनिवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांनीही हजारी गाठली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोना रुग्णांचा आकडा 289 वर गेला असून, मृतांचा आकडा 5 इतका झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार 432 झाला तर, मृतांचा 105 वर पोहोचला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शनिवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांनीही हजारी गाठली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोना रुग्णांचा आकडा 289 वर गेला असून, मृतांचा आकडा 5 इतका झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा तीन हजार 432 झाला तर, मृतांचा 105 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात शुक्रवारप्रमाणे शनिवारीही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढू लागली आहे. 

क्लिक करा : तळिरामांचा भ्रमनिरास; परवानाधारकांनाच मिळणार ऑनलाईन मद्य

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 94 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा एक हजार 90 वर पोहोचला. त्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 80 बाधितांच्या नोंदीसह तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा एक हजार 128 इतका झाला असून मृतांचा आकडा 26 वर गेला आहे.

कल्याण डोंबिवलीत 35 रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 459 तर, मृतांचा आकडा 10 झाला आहे. उल्हासनगरमध्ये 12 रुग्णांची नोंद करण्यात आली असून बाधितांचा आकडा 106 झाला. तसेच मीरा-भाईंदरमध्ये 21 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा 312 झाला असून मृतांचा आकडा नऊ झाला आहे. 

भिवंडी महापालिका क्षेत्रात तीन नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा 41 झाला आहे. बदलापूरमध्ये 19 रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा 98 झाला. तसेच अंबरनाथमध्ये एका नवी रुग्णांच्या नोंदीमुळे बाधितांचा आकडा 33 वर गेला. तर, ठाणे ग्रामीण भागात 24 नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा 165 वर गेला आहे. 

क्लिक करा  : आता खऱ्या अर्थाने स्थानिकांना रोजगाराची संधी

मीरा-भाईंदरमध्ये 2 पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असताना मीरा-भाईंदर पोलिस दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मीरारोड पोलिस ठाण्यातील 2 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी रात्री समोर आले आहे. त्यातील एका कर्मचाऱ्याला शहापूरला तर दुसऱ्याला ठाण्यातील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मीरारोड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दोन्ही बाधित पोलिस कर्मचारी एस. के. स्टोन, सिनेमॅक्स नाक्यावर बंदोबस्तासाठी कार्यरत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients cross thousands in Thane, 289 new patients in the district