esakal | आळस झटका...आता स्थानिकांना खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

local Labour

चारबंदीमुळे ठिकठिकाणच्या बांधकामांना ब्रेक लागला. सरकारने बांधकामांना परवानगी दिल्याने अनेक ठिकाणची बांधकामे सध्या सुरू झाली आहेत. मात्र, बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश मजूर हे परप्रांतीय असून 90 टक्के मजूर आपल्या राज्यात निघून गेल्याने काम वेळेत पूर्ण करायचे कसे? या चिंतेने विकासक ग्रासले आहेत. या संधीचा फायदा घेऊन राज्यातील अनेक बेरोजगार नागरिकांना काम मिळू शकते, असा मतप्रवाह विकासकांकडून व्यक्त होत आहे. 

आळस झटका...आता स्थानिकांना खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी 

sakal_logo
By
मयूरी चव्हाण-काकडे

कल्याण : संचारबंदीमुळे ठिकठिकाणच्या बांधकामांना ब्रेक लागला. सरकारने बांधकामांना परवानगी दिल्याने अनेक ठिकाणची बांधकामे सध्या सुरू झाली आहेत. मात्र, बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश मजूर हे परप्रांतीय असून 90 टक्के मजूर आपल्या राज्यात निघून गेल्याने काम वेळेत पूर्ण करायचे कसे? या चिंतेने विकासक ग्रासले आहेत. या संधीचा फायदा घेऊन राज्यातील अनेक बेरोजगार नागरिकांना काम मिळू शकते, असा मतप्रवाह विकासकांकडून व्यक्त होत आहे. 

वाचा सविस्तर : मंदीत दलालांनी साधली संधी, स्थलांतरितांकडून बक्कळ वसुली

सध्या उभारण्यात येत असलेल्या गगनचुंबही टॉवर, इमारती या हजारो कामगारांच्या घामावरच उभ्या राहत आहेत. परप्रांतीय मजूर या कामात स्वतःला संपूर्णपणे झोकून देतात. यात महाराष्ट्र राज्यातील मजुरांची संख्या अत्यल्प असल्याचे विकासक सांगतात. सध्या उडिसा, आसाम,  झारखंड, बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक व इतर राज्यातील सर्वच कामगार आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे एका बांधकामाच्या जागी केवळ 10 ते 15 मजुरांना घेऊनच विकासकांना कामे करावी लागत आहेत. 

मजूर, कामगारांमध्ये कुशल आणि अकुशल असे दोन प्रकार असून कुशल कामगार दिवसाला 1 हजार ते 1200 रुपये, तर अकुशल कामगार 500 ते 700 रुपये कमवू शकतो. त्यामुळे कामगारांच्या कमतरतेमुळे कुशल कामगार म्हणून राज्यातील बेरोजगारांना कामाची सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मराठी कुशल कामगारही महिन्याला 26 ते 30 हजार रुपये प्राप्त करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. राज्यातील बेरोजगारांनी आता याच संधीचे सोने केले पाहिजे, असा मतप्रवाह व्यक्त होताना दिसून येत आहे. 

क्लिक करा : उकाड्यात सरली रात्र, दिवसाही त्याच वेदना

कामगारांचे दर वाढणार?
कोरोनामुळे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले. मात्र ते भविष्यात आपल्या कुटुंबाच्या गरजा ओळखून पुन्हा शहराची वाट धरतील अशी शक्यता आहे. राज्यात कामगार न मिळाल्यास परप्रांतीय कामगारांना पुन्हा बड्या शहरात आकर्षित करण्यासाठी काही कालावधीकरिता का होईना कामगारांचे दर वाढवावे लागतील, अशी चर्चाही बांधकाम क्षेत्रात सुरू आहे. 

नियोजित प्रकल्पात परप्रांतीय कुशल कामगारांचा मोलाचा वाटा असतो. सध्या बहुतांशी परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले आहेत. तसेच आपल्या राज्यातही बेरोजगारी वाढायला सुरुवात झाल्याने या संधीचा फायदा घेत राज्यातील नागरिकांनी मेहनतीने काम केल्यास अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा होईल.
- रवी पाटील, माजी अध्यक्ष,
महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्री, कल्याण डोंबिवली

माझ्याकडे बहुतांश कामगार हे परप्रांतीय होते. आता 10 ते 15 कामगार घेऊन काम करावे लागत आहे. कुशल कामगार म्हणून राज्यातील बेरोजगार व्यक्तींनी या संधीचे सोने केले तर हजारो स्थानिक कामगार कुटुंबाच्या गरजा भागू शकतील.
- संतोष डावखर, विकासक