esakal | लक्षण नसलेल्या कोरोनाबाधितांना 10 दिवसात घरी पाठवणार, पालिकेकडून अंमलबजावणी सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

hospitals

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना आता दहा दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा रुग्णांना कोरोना चाचणीच्या अंतिम अहवालाची देखील गरज नाही.

लक्षण नसलेल्या कोरोनाबाधितांना 10 दिवसात घरी पाठवणार, पालिकेकडून अंमलबजावणी सुरु

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना आता दहा दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा रुग्णांना कोरोना चाचणीच्या अंतिम अहवालाची देखील गरज नाही. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने काढलेल्या सूधारीत परिपत्रकानुसार नवी मुंबई महापालिकेने अंमलबजावणीला सुरूवात केली आहे.

महत्वाची बातमी : आजपासून सुरु झालेल्या स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक खास तुमच्यासाठी..

राज्यभरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाबाधितांच्या आकड्यापुढे सरकारचे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे; मात्र अशा रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे आरोग्य विभागांना त्या रुग्णांना हॉस्पीटलमध्ये भरती करावे लागत आहे. कोरोनावर कसलाही इलाज उपलब्ध नसल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यापलिकडे कोणताच उपचार त्या रुग्णांवर केला जात नाही. याउलट रोज सकाळी नाश्ता, पाणी, चहा व दोन वेळच्या जेवणाचा भार सरकारी यंत्रणांना सोसावा लागत आहे. तसेच या रुग्णांमुळे रुग्णालयांतील खाटा अडकून पडत असून प्रकृती खालावलेल्या रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. 
सतत वाढत असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसहीत सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या नव्या सूचनांनुसार कोरोनाग्रस्त रुग्णांना घरी पाठवण्याचे सूधारीत धोरण जाहीर केले आहे. 

मोठी बातमी सामनातून सरकारला थेट 'हा' सवाल, जनतेचा धीर सुटणार नाही याचीही काळजी घेण्याचा सल्ला

कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाईन केल्यापासून सातव्या ते नवव्या दिवसापर्यंत लक्षणे न आढळल्यास घरी सोडून देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी संबंधित रुग्णांची अंतिम कोरोना चाचणी न करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकावर नवी मुंबई महापालिकेने अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकाऱ्यांना सरकारच्या सूधारीत धोरणावर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

नक्की वाचा : मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

नवे धोरण पालिकेच्या पथ्यावर
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन जेजे, कस्तुरबा अथवा हाफकिन्स संस्थेला पाठवले जाते. या संस्थांकडून अहवाल आल्यावर क्वारंटाईन केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जाते; मात्र या ठिकाणी सर्वत्र ठिकाणाहून नमूने येत असल्यामुळे महापालिकेने पाठवलेले नमून्यांचे अहवाल प्राप्त होण्यास सहा ते सात दिवसांचा कालावधी जातो. तोपर्यंत कोरोनातून मूक्त झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन केंद्रात ताटकळत राहावे लागते. पालिकेने पनवेल येथे इंडीया बूल्समध्ये क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना या दिरंगाईचा फटका बसला होता. परंतू आता नव्या परिपत्रकानुसार लक्षणे नसल्यास रुग्णांना दहाव्या दिवशी घरी सोडणार असल्याने पालिकेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

हे ही वाचा : गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्याबाबत सरकारने नवे धोरण जाहीर केले आहे. त्याप्रमाणे रुग्णांना सोडण्यासाठी नव्या परिपत्रकानुसार कार्यवाही केली जाणार आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका   

  • एकूण 779 रुग्ण
  • इंडीया बूल्स कोव्हीड सेंटरमध्ये असलेले रुग्ण- 610
  • वाशी रुग्णालयातील रुग्ण- 71
  • वाशी सेक्टर 14 बहुउद्देशिय इमारतीमधील कोव्हिड केंद्रातील रुग्ण- 71

Corona patients without symptoms will be sent home in 10 days, implementation started by the municipality

loading image