मतदानासाठी PPE कीट घालून मनसे महिला सदस्य कोविड सेंटरमधून थेट ग्रामपंचायत कार्यालयात

पूजा विचारे
Saturday, 22 August 2020

भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत कार्यालयात. मनसेची महिला सदस्य थेट कोविड सेंटरमधून पीपीई कीट घालून थेट मतदान करण्यासाठी कार्यालयात पोहोचली. 

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबई जरी कोरोना नियंत्रणात येत असला तरी ठाणे, भिवंडी या भागात कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही कायम आहे. भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. अशातच भिवंडीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला आहे, भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायत कार्यालयात. मनसेची महिला सदस्य थेट कोविड सेंटरमधून पीपीई कीट घालून थेट मतदान करण्यासाठी कार्यालयात पोहोचली. 

भिवंडीत ग्रामपंचायत उपसरपंचाची निवडणूक होती. या निवडणुकीच्या मतदानासाठी सदस्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यासाठी मनसेची महिला सदस्य थेट पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आल्या. या महिला सदस्यावर कोविड १९ सेंटरमध्ये उपचार सुरु होत्या. या प्रकारानं कार्यालयात एकच खळबळ माजली होती. 

यावेळी सरपंच पराग पाटोळे यांनी या महिला सदस्याला विरोध करत त्यांना जाण्यास सांगितलं. त्यानंतरही महिला २० ते २५ मिनिटं तिथेच बसल्या. त्यानंतर अखेर पोलिसांना बोलावलं आणि त्यांना मतदान करु दिलं नाही.

हेही वाचाः  गणेश चतुर्थीदिवशीही मुंबईत पावसाचा जोर कायम, येत्या २१ तारखेपर्यंत कसा असेल पाऊस, वाचा सविस्तर

दरम्यान भिनारमधील कोविड १९ सेंटर केंद्रातून त्यांना सोडलंचं कसं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता करण्यात येतेय. महिला सदस्य कोविड सेंटरमधून कार्यालयात आल्यानं इतर सदस्य आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अधिक वाचाः  भूमिपूजन केलं आणि दुसऱ्याच दिवशी कोसळला कृत्रिम तलाव, लाखो रुपयांचं नुकसान

या निवडणुकीत भाजपचे ५ सदस्य तर मनसेचे ३आणि शिवसेनेचे ७ असे १५ सदस्य आहेत. भाजपच्या वतीने प्रणिती जगे तर मनसेच्यावतीने श्वेता बिडवी यांच्यामध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानं मनसेच्या श्वेता बिडवी विजयी झाल्या आहेत.

Corona Positive MNS Female Member Reached Gram Panchayat Office bhiwandi voting


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Positive MNS Female Member Reached Gram Panchayat Office bhiwandi voting