
पालघरच्या पर्यटनाला पुन्हा उभारी; सलग चार सुट्या; समुद्रकिनारे बहरले
वसई : सलग चार सुट्या, कोरोनाचे हटवलेले निर्बंध यामुळे पर्यटकांची पावले आता पालघरच्या समुद्रकिनाऱ्यांकडे वळत आहेत. आज पहिल्या दिवशी पालघरमधील विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली. आधीच कोरोनामुळे विस्कळित झालेली घडी आता पूर्वपदावर येत असल्याने येथील हॉटेल, रिसॉर्टचालकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे; परंतु वाढत्या महागाईचा फटका व्यावसायिक आणि त्याचबरोबर पर्यटकांनाही बसत आहे.
पालघरमध्ये डहाणू, केळवे, वसई, अर्नाळा, बोर्डी, भाईंदर या ठिकाणचे विस्तीर्ण समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पर्यटनाच्या हंगामात येथील समुद्रकिनारे गर्दीने भरलेले असतात; परंतु गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने यावर अवलंबून असलेले स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक हवालदिल झाले होते.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे नागरिक मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. सध्या उष्णतेची लाट आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच गुरुवार, १४ एप्रिलपासून रविवारपर्यंत (ता. १७) सलग चार दिवस सुट्या आल्याने मुंबई, ठाण्यातील पर्यटकांची पावले पालघरमधील समुद्रकिनाऱ्यांवर वळत आहेत.
समुद्रकिनारी पर्यटक येत असल्याने स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत. महागाईमुळे रिसॉर्टमध्ये पॅकेजचे दर वाढले आहेत; मात्र निर्बंध हटवल्याने व उष्णतेत वाढ झाल्याने पर्यटक समुद्रकिनारी येत असल्याने हॉटेल, रिसॉर्ट बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- कुंदन पाटील, पर्यटन विकास संस्था
निर्बंधांमुळे पर्यटनाचे बेत आखता येत नव्हते. निर्बंध हटवल्याने स्वच्छंदी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी डहाणू समुद्रकिनारी आलो आहोत. खूप बरे वाटत आहे.
- राहुल नाईक, पर्यटक, मुंबई
मासळी, तेल, सिलिंडर महागल्याचा फटका
समुद्रकिनारी ताजी मासळी खाण्यासाठी पर्यटक येतात. हॉटेल, रिसॉर्टचालकही पर्यटकांना हवी तशी आणि पाहिजे तेवढी मासळी पुरवतात; परंतु मासळीबरोबरच तेल, तांदूळ, सिलिंडरचे दर प्रचंड वाढल्याने खाद्यपदार्थांचे दरही वाढले आहेत. पूर्वी दरामध्ये सूट दिली जायची; परंतु ही सूट आता देणे परवडणारे नसल्याचे अर्नाळा येथील एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.
Web Title: Corona Restrictions Relaxation Revitalize Palghar Tourism Beach Vasai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..