Corona Vaccination: उद्यापासून 8 मार्चपर्यंत मुंबईत विशेष मिशन इंद्रधनुष्य

भाग्यश्री भुवड
Sunday, 21 February 2021

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021 दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

मुंबई:  बालकांमधील मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून पहिल्या दोन वर्षात बालकांचे लसीकरण झाल्यास पुढील आयुष्यात विविध आजारांचा मुकाबला करणे त्यांना शक्य होते. अर्धवट लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात. त्याचसाठी 0 ते 2 वर्ष वयोगटातील बालके आणि गरोदर माता यांचे लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने विशेष लसीकरण मोहीम ही ऑक्टोबर 2017 पासून ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ या नावाने सुरु केली आहे. 

या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2021 दरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. आपल्या देशात बालमृत्यू आणि प्रसूती दरम्यान होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास या लसीकरणामुळे मदत होणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केंद्र शासनाने मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत चार मोहिमा मुंबईत आजतागायत यशस्वीरित्या राबविल्या आहेत. 2021 मध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ मोहीम फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कार्यभूत होणार आहे. प्रत्येक महिन्यात 15 कार्यालयीन कामकाजाचे दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम ही दोन फे-यांमध्ये राबविण्यात येणार असून, पहिली फेरी फेब्रुवारी महिन्यात तर दुसरी फेरी मार्च महिन्यात होणार आहे. या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्रांतर्फे शहरी भागातील झोपडपट्टी, बांधकामे, अतिदुर्गम भाग किंवा डोंगराळ भाग, लसीकरणाचे काम असणारे भाग इत्यादी जोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा-  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे धक्कादायक विधान, अडचणीत येण्याची शक्यता

पल्स पोलिओ कार्यक्रम अंतर्गत आढळून आलेल्या अति जोखिमग्रस्त भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. या अति जोखीमग्रस्त भागांमध्ये लसीकरणापासून पूर्णतः आणि अंशतः वंचित असलेल्या मुलांचे प्रमाण जास्त आढळून येते. विशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत या अति जोखीमग्रस्त भागांमध्ये विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येते.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona special vaccination campaign implemented Greater Mumbai Municipal Corporation area from February 22


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona special vaccination campaign implemented bmc area from February 22