खाजगी रुग्णालयांना मोफत लसीकरण करण्याची सूचना; 'हे' आहे कारण| corona vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

खाजगी रुग्णालयांना मोफत लसीकरण करण्याची सूचना; 'हे' आहे कारण

मुंबई : मुंबईसह संपूर्ण राज्यात लसीकरण मोहीमेचा (vaccination drive) वेग मंदावला असून विशेष करुन खासगी रुग्णालयात (Private Hospital) लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील लशीच्या मात्रा विनावापर (No usage of dose) पडून आहेत. खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम थंडावल्याने राज्यभरातील खाजगी रुग्णालयात 53 लाख डोस विनापडून असल्याने ते व्यर्थ होण्याची चिंता राज्य सरकारच्या (mva government) आरोग्य विभागाला (health Authorities) सतावत आहे.

खासगी रुग्णालयांना लशीच्या मात्रा थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे लस उत्पादकांनी लशीच्या मात्रा खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या. त्यानंतर मे, जून महिन्यात लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी नोंदणी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी लाभार्थ्यांची गर्दी होऊ लागली. तर सरकारी केंद्रांवर लसीच्या मात्रा कमी पडू लागल्याने लाभार्थ्यांची गर्दी होऊ लागली.

असोसिएशन ऑफ हेल्थ प्रोव्हायडर्स महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष डॉ. जॉय चक्रवर्ती म्हणाले की, खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचा आलेख खाली गेला आहे. गेल्या काही महिन्यांत हा आलेख 90 टक्क्यांनी घसरला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये मे ते जुलै या कालावधीत दररोज सुमारे 2 हजार लोकांना लसीकरण केले जात होते, ते आता 200 ते 300 पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे लसींचा साठा वाढला आहे. मे महिन्यात खरेदी केलेल्या लसींची मुदत फेब्रुवारीमध्ये संपते. लसीकरणाचा वेग पाहून केंद्र आणि राज्य सरकारलाही लस वाया जाऊ नये, याची जाणीव करून देण्यात आली आहे.

डॉ. चक्रवर्ती यांनी सांगितले की, लसीचा अपव्यय टाळण्यासाठी बूस्टर डोसचा पर्यायही सुचवण्यात आला आहे, मात्र याबाबत कोणतेही धोरण नसल्याने डोस वाया जात असल्याची चिंता रुग्णालय व्यवस्थापकांमध्ये कायम आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांमध्ये लसींचा मोठा साठा शिल्लक आहे. हा साठा वाया जाऊ नये म्हणून सीएसआर अंतर्गत काही खासगी रुग्णालये झोपडपट्टी भागात मोफत लसीकरणाची तयारी करत आहेत.

इतकेच नाही तर अनेक रुग्णालयांनी कॉर्पोरेट कार्यालयात सवलतीच्या दरात लसीकरण करण्याची तयारीही दर्शवली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले की, 52 लाख डोस वाया जाऊ नयेत म्हणून या खासगी रुग्णालयांना मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने कमी लसीकरण असलेल्या जिल्ह्यांमध्ये सीएसआर अंतर्गत मोफत लसीकरण करण्याची सूचना केली आहे.