Corona vaccination: पोस्ट लसीकरण तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 'वॉर रूम'

मिलिंद तांबे
Tuesday, 19 January 2021

पोस्ट लसीकरण तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वॉर रूमची मदत घेण्यात येणार आहे. वॉर रूममधून तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

मुंबई: पोस्ट लसीकरण तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वॉर रूमची मदत घेण्यात येणार आहे. वॉर रूममधून तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी वॉर रूम मध्ये वैद्यकीय तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. आरोग्यासंबंधी तक्रारींसाठी संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

कोरोना लसीकरणाचे काम 16 जानेवारीपासून सुरु झाले आहे. लसीकरणानंतर संबंधित लाभार्थींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नये अथवा त्यांच्या शंकाचे निरसन करण्याकरीता या  लाभार्थींवर थेट पालिका वॉर्ड  वॉर रुमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांना वॉर रुमचा नंबर दिला जात असून लाभार्थींना आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्यास अथवा इतर समस्या जाणवल्यास 'वॉर्ड वॉर रुम' सातत्याने संपर्कात असणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविडच्या रुग्णांना तात्काळ मदत आणि खाटा उपलब्ध होण्याकरिता पालिका आरोग्य विभागाने पालिकेच्या वॉर्ड निहाय 24 वॉर रुम कार्यान्वित केल्या आहेत. नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने वॉर्ड रूमवरील कामाचा ताण काहीसा हलका झाला आहे. त्यामुळे पोस्ट कोविड रुग्णांच्या मदती व्यतिरिक्त वॉर रुम लसीचा डोस घेणाऱ्या लाभार्थींच्या तब्येतीवर लक्ष ठेवणार आहे. लाभार्थींनी घेतलेल्या लसीचा त्यांच्यावर काही दुष्यपरिणाम तर होत नाही ना, याची माहिती प्रत्येक दिवशी घेतली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी शीला जगताप यांनी सांगितले की, लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक लसीकरण केंद्रांवर साधारण अर्धा तास आरोग्य कर्मचाऱ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली नजर ठेवली जाईल. त्यानंतर संबंधित लाभार्थी घरी गेल्यानंतर त्यांना स्थानिक वॉर्ड वॉर रुमचा नंबर देण्यात येतो. त्याच सोबत वॉर रुम मध्ये देखील लाभार्थींबाबत इत्तंभूत माहिती देण्यात येत आहे. 

हेही वाचा- शनिवारी उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकाच मंचावर, महापौरांनी दिलं कार्यक्रमाचं निमंत्रण

वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून लाभार्थींच्या आरोग्याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. यामुळे लाभार्थींची मिनिटा-मिनिटाची अपडेट वॉर रुमच्या प्रतिनिधीला मिळणार आहे. लसीचा काही दुष्पपरिणाम दिसून येत असल्यास लाभार्थींनी त्याबाबतची माहिती तत्काळ वॉर्ड वॉर रुमला कळविणे गरजेचे आहे. यानंतर त्यांना तात्काळ मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 24 तास तीन शिफ्टमध्ये मदत कार्य सुरू राहणार आहे. वॉर रूममध्ये विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य वैद्यकीय कर्मचारीही लाभार्थींच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत असे ही त्यांनी पुढे सांगितले.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona vaccination War room for resolving post-vaccination complaints


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccination War room for resolving post-vaccination complaints