Corona Vaccine Centre: मुंबईत लवकरच आणखी 25 लसीकरण केंद्र

मिलिंद तांबे
Thursday, 28 January 2021

मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबई: मुंबईत लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला असून येत्या आठवड्याभरात नवे 25 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत सध्या 10 रुग्णालयांत 65 लसीकरण केंद्र कार्यरत आहेत. 

येत्या आठवड्यात आणखी 25 लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार असून दिवसाला 9 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात साधारणता सव्वा लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण करायचे आहे. पहिला टप्पा लवकरात लवकर संपवायचा असल्याने पालिकेने आणखी 25 नवे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत हजारो लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तसंच, आता मुंबईत येत्या आठवड्यात लसीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

'महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपरमध्ये आता 5 ऐवजी 10 लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. तर वांद्रे येथील जम्बो कोविड केंद्रात 15 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सर्व केंद्रांवर 100 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, गोरेगावमधील नेस्को आणि दहिसरमधील जंबो कोविड केअर सेंटर पुढील लसीकरण केंद्रे असू शकतात', अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा- असे येडे बरळतच असतात; लक्ष्मण सावदी यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कडाडले

कोविन ऍपवरून लाभार्थ्यांना लसीकरणासाठी संदेश पाठवत आहोत. संदेश न गेल्यास महापालिकेच्या विभाग कार्यालयातून उपस्थितीसाठी संपर्कही साधण्यात येतोय. वॉक इन व्हॅक्सिन सुरू केल्यापासून लसीकरणासाठी प्रतिसाद वाढत आहे. लसीबाबत गैरसमज, अफवा दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर लवकरच जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccine 25 more vaccination centers Mumbai news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccine 25 more vaccination centers Mumbai news