हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट

मुंबई:  कोरोनामुळे धारावीतील अनेक व्यवसाय धंदे बंद पडल्याने त्याचे सावट यंदाच्या दिवाळीवर दिसून येत आहे. धारावीत मुख्यत: चामड्याचे उद्योग, चामड्याचे साहित्य विक्री करणारे दुकानदार, कुंभारवाडा येथील दिवाळीत पणत्या आणि अन्य साहित्य विक्री करणारे, कंदील, रांगोळ्या आदी दिवाळीला लागणारे साहित्य विक्री करणाऱ्यांवर हातावर हात ठेऊन बसण्याची वेळ आली आहे. 

विक्रेते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वाट पाहून आपली दुकाने बंद करून उद्या तरी विक्री होईल या आशेवर दररोज दुकान उघडून बसत आहे. धारावीतील अनेक कामगार आपल्या गावी गेले आहेत. त्यातील काही कामगार धारावीत परतत आहेत. पण जरी काम, गारमेंट यांना म्हणावी तशी मागणी नसल्याने कारागिरांना कुठून काम द्यायचे असा प्रश्न सध्या मालकांना पडलेला आहे. या परिस्थितीमुळे गावी गेलेले कारागीर परत येण्यास कचरत आहेत.

दसरा संपून दिवाळीच्या लगबगीला सुरुवात झाली की, दिवाळीत हमखास लागणारी महत्वाची वस्तू म्हणजे पणत्या त्याच्या विक्रीकरिता कुंभारवाडा दरवर्षीप्रमाणे मातीचे साहित्य विक्रीसाठी सजला आहे. पण यंदा दिवाळी तोंडावर आली तरी दरवर्षीप्रमाणे होणारी ग्राहकांची गर्दी यंदा दिसून येत नाही. दिवाळी हा दिव्यांचा सण संपूर्ण घर पणत्यांच्या आणि दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. 

धारावीतील कुंभारवाडा हा पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी अतिशय सुबक आणि कमी किंमतीमध्ये दिवे आणि पणत्या मिळतात. मुंबईच्या विविध भागातून खरेदी करण्यास सर्वसामान्य लोकांसह चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळी, राजकीय नेते येथे येतात. दीपोत्सवाला सजवणाऱ्या विविध पणत्या मोठ्याप्रमाणावर इथूनच खरेदी केल्या जातात.

नवरात्री, दिवाळी हे सण म्हणजे कुंभारांना चांगले दिवस देऊन जातात. दिवाळी सणात येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे यावर मर्यादा आल्याचे गोविंद चीत्रोडा यांनी सांगितले, यावर्षी आम्ही दिवाळीत विक्रीसाठी लागणारे साहित्य कमीच बनवले आहेत. याचे कारण म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने दरवर्षी मुंबईबाहेरून येणारे आमचे ग्राहक येऊ शकणार नाहीत. यामुळे आमच्या धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे आमच्या धंद्याला मार बसला आहे. मे महिन्यापर्यंत वाटत होते कि, कोरोना आटोक्यात येईल पण झाले उलटेच आजही कोरोनाच्या धास्तीने मोजकेच ग्राहक कुंभारवाड्यात खरेदीसाठी येत आहेत. दरवर्षी नवरात्रोत्सव, दिवाळीत आमचा माल आम्ही विदेशात पाठवत असून यंदा याला आळा बसल्याचे व्ही. आर. अर्थन पॉटसचे मालक रावजी टांक यांनी दैनिक 'सकाळ' शी बोलताना सांगितले.

चामड्याच्या साहित्याची विक्री करणारे साई कलेक्शन दुकानाचे मालक राम कोकणे यांनी दरवर्षी आम्हाला जेवायलाही फुरसत मिळत नसते कारण, मोठाल्या कंपन्यांची चामड्याच्या वस्तूंची मोठी मागणी असायची तर दुकानात पाय ठेवायला जागा नसायची.  यावर्षी मात्र, सकाळी दुकान उघडल्यावर रात्रीपर्यंत तुरळक प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यातही विचारणा करणारे ग्राहक जास्त असतात. दरवर्षीपेक्षा यंदा दहा टक्के सुद्धा विक्री झाली नाही. दुकानातील कामगाराचे वेतन, दुकानाचे भाडे, वीज बिल कसे भरायचे याची चिंता लागून राहिल्याचे कोकणे यांनी सांगितले.

कंदील, रांगोळ्या विक्रेत्यांकडे ग्राहक म्हणावा तसा येत नसल्याचे गंगुबाई या विक्रेता महिलेने सांगितले. यंदाची दिवाळी धारावीत दरवर्षीप्रमाणे साजरी होणार नसल्याचे दिसत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मोठाले कंदील लावण्याची परंपरा आहे. तसेच कंदील धारावीतही लावले जातात. खांबदेव तरुण मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष लिंबोरे यांनी यंदा कंदील लावायचा की नाही हे ठरलेले नाही. पण छोटासा का होईना कंदील लावू अशी माहिती दिली. अनेकांचे रोजगार गेल्याने म्हणावा तसा उत्साह धारावीत दिसत नाही.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona virus affect this year Diwali business in Dharavi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com