आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव! कळवा रुग्णालयात 21 अधिकारी, कर्मचारी बाधित

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तब्बल 21 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे

ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तब्बल 21 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणारे आरोग्य विभागाचे कार्यालयच सील करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित कर्मचाऱयांच्या संपर्कातील 35 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही होम क्वारंटाईन केले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

शहरात कोरोनावर उपचार करणारेच वैद्यकीय विभागातील अधिकारी आता कोरोनाबाधित होण्यास सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रुग्णालयातील चार ते पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता हा आकडा थेट 21 वर जाऊन पोहचला आहे. यामध्ये 8 ते 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे येथील तीन ते चार विभाग सध्या सील करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर हा विभाग एक दिवस सील करून निजर्तुंकीकरण करण्यात आला होता.

1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वे ट्रेन्सचं बुकिंग सुरु, 'हे' आहेत नियम, 'असं' करा तिकीट बुक

आता मात्र कळवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाबतच्या बैठकीसाठी महापालिका मुख्यालयात येत होते, त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य विभागातील दोन वैद्यकीय अधिकारी आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 35 जणांनाही होम क्वारंटाईन केल्याची माहिती कोविड समन्वयक डाॅ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. सध्या चौथ्या मजल्यावरील आरोग्य विभागाचे कार्यालय पूर्णपणे सील केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona virus infiltrates health department! Report 21 officers, staff affected at the hospital