रुग्णांची सेवा करणारे कोरोना योद्धे 'देवदूत', राज्यपालांचे गौरवोद्गार

मिलिंद तांबे
Friday, 16 October 2020

कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  काढले.

मुंबई: कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  काढले. गौरविण्यात आलेल्या कोरोना योद्ध्याला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा देखील राज्यपालांनी यावेळी केली.

राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात कोरोना साथरोग नियंत्रणासाठी कार्य करणाऱ्या राज्यातील विविध आरोग्य सेवकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

यावेळी डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यानिक अधिकारी, सफाई कामगार, आशा कार्यकर्ती, कक्षसेवक, भट्टीचालक, क्ष-किरण अधिकारी, परिसेविका अशा सुमारे 50 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास आणि अवर सचिव अर्चना वालझाडे या दोघांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

अधिक वाचाः  पोस्ट कोविड OPD मध्ये पल्मनरी फायब्रोसिसचे वाढते रुग्ण, उपचारानंतरही अशक्तपणा

कोरोना संसर्ग सुरू सुरुवात झाल्याच्या पहिल्या दिवसापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे मैदानात उतरलेत आणि कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले असे राज्यपाल यावेळी म्हणाले. कोरोना रुग्णांची सेवा करणारे हे योद्धे देवदूत आहेत. त्यांचे कौतुक करायला शब्द देखील कमी पडतील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. 

ज्याप्रमाणे सीमेवर लढून सैनिक देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे कोरोना योद्ध्यांनी रुग्णांचे रक्षण करुन त्यांना जीवनदान देण्याचे काम केले आहे. सर्वांनी नेहमी चांगला विचार करा. चांगले काम करा. सकारात्मक विचार करत रहा, असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला.

अधिक वाचाः  'मुलूंड' ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट, सात दिवसात एक हजार नव्या रुग्णांची भर

आज झालेला हा सत्कार वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचाच आहे. आरोग्य विभागाकडे सामान्य माणूस आशेने पाहत असून त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागत, आस्थापूर्वक चौकशी करीत रुग्णांना बरे करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्यातील रुग्णांना अधिक चांगली आणि दर्जेदार सेवा देण्याकरिता मिशन मोडवर काम करु, अशी ग्वाहीही आरोग्यमत्र्यांनी यावेळी दिली.

कोरोनाच्या लढाईमध्ये आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांनी जोरदार लढाई लढली असून राज्यामध्ये बऱ्याच अंशी परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona warriors angels serving patients Governor Bhagat Singh Koshyari said


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona warriors angels serving patients Governor Bhagat Singh Koshyari said