नवी मुंबई : १५ नोव्हेंबरला कोविड योद्ध्यांच्या घरांची सोडत | corona warriors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cidco

नवी मुंबई : १५ नोव्हेंबरला कोविड योद्ध्यांच्या घरांची सोडत

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या (Cidco) कोविड योद्धे (corona warriors) आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील (special housing scheme) उपलब्ध घरांसाठी १५ नोव्हेंबरला संगणकीय पद्धतीने सोडत (lottery) काढण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना सोडतीत घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम (Applicants Deposit) भरली आहे, अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रियेद्वारे सदनिका (Apartment handover) अदा करण्यात येणार आहेत. यात प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांचाही समावेश करण्यात येणार आहे.

हेही वाचा: परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला

सिडकोकडून, कोविड-१९ महासाथीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य व सफाई कर्मचारी, पोलिस आणि अन्य गणवेषधारी कर्मचाऱ्यांसाठी १५ ऑगस्ट २०२१ ला कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये एकूण ४,४८८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली. यापैकी १,०८८ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, तर उर्वरित ३,४०० घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत.

या योजनेसाठी पहिली संगणकीय सोडत २९ ऑक्टोबर २०२१ रोजी काढण्यात आली होती. उपलब्ध घरांसाठी आणि अनामत रकमेचा भरणा केलेल्या; परंतु ज्यांना अद्याप घर वाटप झालेले नाही, अशा सर्व अर्जदारांकरीता दुसरी संगणकीय सोडत उपरोक्त तारखेस काढण्यात येणार आहे. दुसऱ्या सोडतीत अर्जदारांनी ज्या ठिकाणास प्राधान्य दिले आहे. त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणचे घर त्यांना वाटप केले जाऊ शकते, सदर सोडत पार पडल्यानंतर वाटप झालेल्या घरांचा स्वीकार करण्यासाठी अर्जदारांना १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सोडतीद्वारे उपलब्ध झालेली सदनिका स्वीकारणे अर्जदारास बंधनकारक नसेल.

"विशेष गृहनिर्माण योजनेची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती, की जरी अर्जदार प्रथम सोडतीत अयशस्वी ठरला तरी प्रत्येक अर्जदाराला उपलब्ध असलेल्या स्थळी सदनिका मिळेल. कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याने ‘प्रत्येक अर्जदारास घर’ या सिडकोने दिलेल्या वचनाची पूर्तता होणार आहे."

- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक सिडको.

loading image
go to top