नवी मुंबईत पुन्हा कोरोनाचा उद्रेक? नागरिकांच्या बेपर्वाईमुळे इशारा 

सुजित गायकवाड
Tuesday, 20 October 2020

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. बरे होण्याचे प्रमाणही 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे, पण आगामी हिवाळा आणि त्याचबरोबरचे नवरात्रोत्सव, दसरा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दीपोत्सवाच्या काळात रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची भीती प्रशासन व्यक्त करत आहे.

नवी मुंबई : चाचण्यांचे वाढलेले प्रमाण, निकट संपर्क शोधण्यासाठी केलेले प्रयत्न आणि योग्य उपचारांमुळे नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. बरे होण्याचे प्रमाणही 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे, पण आगामी हिवाळा आणि त्याचबरोबरचे नवरात्रोत्सव, दसरा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या दीपोत्सवाच्या काळात रुग्णसंख्येचा उद्रेक होण्याची भीती प्रशासन व्यक्त करत आहे. उत्सवांसाठी खरेदीत दंग असलेले नागरिक सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्‍यक असलेल्या मास्क आणि अन्य बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यानेही प्रशासन चिंता व्यक्त करत आहे. 

हे वाचा : रेमडेसिवीर कोरोनासाठी कुचकामी 

नवी मुंबईत कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत कोव्हिड सेंटर उभी केली. महापालिका रुग्णालयांमध्ये तपासणी, चाचणीच्या चांगल्या सुविधा दिल्या. त्याचा परिणामही स्पष्ट दिसला, पण आता विषाणूसाठी पोषक असलेला थंडीचा काळ काळ सुरू होत असल्याने अथक प्रयत्नांतून नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा रौद्ररूप धारण करण्याची भीती प्रशासनाला सतावत आहे. 

हे वाचा : किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढणार

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी अशा उत्सवांचा काळही सध्या असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका पालिकेतर्फे वर्तवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर "कायम सावध' हाच कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. मास्कचा नियमित वापर ही बचावाची ढाल आहे. त्यासोबतच नियमित हात धुणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे अतिशय गरजेचे आहे. या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन होण्याची गरज आहे. 

कोरोनाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांच्या काळात मर्यादित असलेली फेरीवाल्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हेसुद्धा कोरोनाच्या उद्रेकाला मुख्य कारण होऊ शकते, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 

कोरोनावर नियंत्रण 
1 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान नवी मुंबईत कोरोनाच्या चार हजार 710 रुग्णांची नोंद झाली आहे; तर पाच हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 14 जुलैला बरे होऊन घरी जाणाऱ्या कोरोनाबाधितांचा दर 61 टक्के होता. तो आता 90 टक्‍क्‍यांपर्यंत पोहचलेला आहे. त्याचबरोबर मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याने 14 जुलैला 3.12 टक्के असणारा मृत्यूदर आता 2.01 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला आहे. 

अशा वाढल्या चाचण्या 
- 14 जुलैपर्यंत 26 हजार 731 चाचण्या 
- त्यानंतरच्या तीन महिन्यांत (15 ऑक्‍टोबरपर्यंत) 2 लाख 42 हजार 289 चाचण्या 
- ऑक्‍टोबरच्या पहिल्या 15 दिवसांत तब्बल 44 हजार 484 चाचण्या 

प्रशासनाच्या जागरूकतेचा फायदा 
नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर कमी करणे आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवणे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देतानाच शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांचे प्रमाण मर्यादित राहील याकडेही प्रशासनाने बारकाईने लक्ष दिले. 14 जुलैला शहरात तीन हजार 535 रुग्ण उपचार घेत होते. ही संख्या कमी करण्यावरच विविध उपाययोजनांच्या माध्यमातून सातत्याने भर देण्यात आला. आता तीन हजारपर्यंत रुग्णसंख्या आहे.  

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांतून या आजारावर नियंत्रण मिळवता आले आहे, परंतु सण आणि बदलणाऱ्या ऋतूमुळे पुन्हा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. 
- अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona wave again in Navi Mumbai? Municipal administration warns citizens