आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय


मुंबई : कोव्हिडच्या संशयित रुग्णांची तत्काळ चाचणी करण्यासाठी महापालिका एक लाख अॅंटीजेन किट खरेदी करणार आहे. या चाचणीमुळे अवघ्या 30 मिनिटांत अहवाल मिळेल. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी खासगी प्रयोगशाळांना या पद्धतीने कोरोना चाचण्या करण्याची शिफारस केली असून, खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट करण्याची सूचना केली आहे. 

महापालिकेने 'मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग' सुरू केले आहे. जुलैच्या मध्यापर्यंत कोव्हिड-19 विषाणूच्या प्रादुर्भावावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचे उद्दिष्ट महापालिका आयुक्तांनी ठेवले आहे. आगामी काळात लॉकडाऊन अधिक शिथिल होण्याची शक्यता असून, त्यासाठी महापालिका तयारी करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एसडी बायोसेन्सर या कंपनीचे अॅंटीजेन टेस्टिंग किट वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने सोमवारी राज्यातही हे किट वापरण्यास परवानगी दिली. 
महापालिका आयुक्त चहल यांनी मंगळवारी अधिकारी आणि खासगी प्रयोगशाळांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधून या चाचण्या करण्यास परवानगी दिली. महापालिका असे एक लाख किट खरेदी करणार अाहे. हे ॲंटीजेन टेस्टिंग किट सर्व सार्वजनिक रुग्णालये आणि कोव्हिड केंद्रांत उपलब्ध असतील. लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. मुंबईतील 35 मोठ्या रुग्णालयांनी हे किट खरेदी करावेत, अशी शिफारसही महापालिका आयुक्तांनी केली आहे.

साडेसहा हजार चाचण्या 
केवळ संशयित रुग्ण नव्हे, तर कोरोनाबाधितांच्या अत्यंत निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जाणार आहे. आयसीएमआरच्या निर्देशांनुसार अतिजोखीम (हाय रिस्क) गटातील व्यक्तींची पाच ते 10 दिवसांत चाचणी करण्यात येते. अशा व्यक्तींच्या दिवसाला सुमारे 2000 अतिरिक्त चाचण्या केल्या जातील. यामुळे सध्याच्या सरासरी 4500 अतिरिक्त 2000 अशा सुमारे 6500 चाचण्या होतील.

कोणत्याही प्रयोगशाळेत चाचणी
कोरोनाबाधिताच्या अत्यंत निकट संपर्कातील (हाय रिस्क कॉंटॅक्ट) व्यक्ती घरातच अलगीकरणात असल्यास, त्यांना कोणत्याही प्रयोगशाळेतून चाचणी करून घेण्याची मुभा देण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व 24 विभाग कार्यालयांशी प्रत्येकी एक वैद्यकीय प्रयोगशाळा संलग्न करण्यात आली आहे. हाय रिस्क गटातील अशा व्यक्तींना विभाग कार्यालयांशी संलग्न प्रयोगशाळांव्यतिरिक्त इतर प्रयोगशाळांमधूनही चाचणी करून घेता येईल. त्यासाठी प्रयोगशाळांना मुभा देण्यात आली आहे.

ज्येष्ठांना प्रिस्क्रिप्शनची सक्ती नाही
70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेतून कोरोना चाचणी करून घेता येईल. अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत असलेल्या एका मदतनीसालाही आवश्यक असल्यास चाचणी करून घेण्याचा पर्याय खुला असेल. डॉक्टरांकडून प्रत्यक्ष वैद्यकीय प्रपत्राऐवजी (फिजिकल प्रिस्क्रीप्शन) ई-प्रिस्क्रिप्शन मिळाले, तरी नागरिकांच्या घरी जाऊन प्रयोगशाळांना चाचणी करता येईल, असे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

उद्योगांसाठी रॅपिड टेस्टिंग किट
रॅपिड टेस्टिंग किटच्या वापराला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ॲबट आणि रोश या कंपन्यांनी तयार केलेल्या अशा रॅपिड टेस्टिंग किटचा वापर करण्यासही मंजुरी मिळाली आहे. या दोन कंपन्यांचे रॅपिड टेस्टिंग किट खासगी कंपन्या, कॉर्पोरेटनी खरेदी करावेत व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करून घ्याव्यात, अशी सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com