गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट! बाजारात गर्दी असली तरी; विशेष खरेदीकडे गणेशभक्तांची पाठ

भाग्यश्री भुवड
Friday, 21 August 2020

न दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे मुंबईच्या बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. कोरोनाची धास्ती लोकांच्या मनात असली तरी  गणपतीसाठीच्या खरेदीने त्यावर सध्या मात केल्याचे चित्र आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई पालिकेने या संबधात विस्तृत नियमावली तयार केली आहे. दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे मुंबईच्या बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. कोरोनाची धास्ती लोकांच्या मनात असली तरी  गणपतीसाठीच्या खरेदीने त्यावर सध्या मात केल्याचे चित्र आहे.  दादर, लालबाग भागात तर कोरोनापूर्व काळात व्हायची तशी गर्दी दिसत आहे. 

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाबाबत अंबरनाथ पालिकेने घेतला महत्वपूर्ण निर्णय

गेले दोन ते तीन दिवस मुंबईकरांच्या गणेश उत्सव खरेदीची प्रमुख केंद्र असलेल्या दादर, परळ, भायखळा, लालबाग या भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र आहे. सण जरी साध्या पद्धतीने साजरा होत असला तरी लोकांचा उत्साह मात्र दरवर्षीप्रमाणेच असल्याचे लक्षात येते. दादर येथे फुल मार्केट, कपड्यांची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने, मिठाईची दुकाने, शोभेच्या वस्तूंची दुकाने गजबजलेली आहेत. दादरच्या फुल मार्केटमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही. सकाळपासून मुंबईत पाऊस ही पडतोय तरी देखील मुंबईकर उत्साहात खरेदी करतांना दिसत आहेत.

मात्र मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे यावर्षी अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने  व्यापाऱ्यांना त्याचा  आर्थिक फटका बसला आहे. पुढच्या दोन दिवसात सामाना खरेदीसाठी मुंबईकर  आणखी गर्दी करतील. लालबाग परिसरातील सर्व व्यवसायांवर 50 टक्के परिणाम झाला असुन इथल्या व्यापाऱ्यांनी केवळ यावेळी  50 टक्के साहित्य दुकानात ठेवले आहे.

गुगलची नोकरी सोडून सुरु केलं स्वतःचं किचन, आता मिळतंय ५० लाखांचं उत्पन्न..

फुल मार्केटवर परिणाम 
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात फूलांची आरास केली जाते. घरगुती आणि मंडळाच्या बाप्पासाठी फुलांची ही प्रचंड मागणी असते मात्र ती ही आता घटली असल्याचे दादर फुल मार्केटमधील फुल व्यावसायिक अविराज पवार यांनी सांगितले आहे.

व्यापारावर 70 टक्के परिणाम 
बाप्पाच्या खरेदीसाठी ग्राहक गर्दी तर करत आहेत. मात्र, यंदा साध्या पद्धतीने गणेश उस्वव साजरा केला जाणार असल्यामुळे विशेष खरेदी केली जात नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी फक्त 30 टक्के खरेदी झाल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. व्यापार एकदम थंड आहे. केवळ काही बेसिक गोष्टींच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत असल्याचे रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी म्हटले आहे. डेकोरेशनचे सामान तर तसेच पडून आहे. मुंबईत लोकल सेवा आणि वाहतूक पुर्णपणे सुरु झाली  नसल्यामुळे ही खरेदीवर मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

 

गेल्या वर्षी आम्ही गणपतीसाठी जे काही साहित्य लागते त्याची 100 टक्के खरेदी केली होती. मात्र, त्याचे प्रमाण यंदा 50 टक्कयांवर आले आहे. खरेदीसाठी या आठवड्यापासून गर्दी झाली आहे. नियमावलीनुसार आम्ही दुकाने सुरु ठेवली आहेत. 
संकेत खामकर, अध्यक्ष, लालबाग मार्केट व्यापारी असोसिएशन

मुंबईच्या रस्त्यावर ट्राफिक जास्त आहे पण, दुकानात गर्दी नाही. गणेश उस्तवाच्या खरेदीसाठी केवळ 30 टक्केच मुंबईकर बाहेर पडले आहे. त्यामुळे व्यवसाय थंड आहे.
विरेन शाह, व्यावसायिक

दरवर्षी कोकणात गणेशोत्सव साजरा करतो. पण, यंदा आम्ही गावी गेलो नाही. मुंबईतच घरगुती गणेशोत्सव साजरा करणार आहोत. बाप्पा येणार यासाठी सर्व तयारी झाली आहे पण, कोरोनाची भीती कायम आहे.
विनित पेडणेकर, ग्राहक

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas death on Ganeshotsav! Although the market is crowded; Lessons of Ganesha devotees towards special purchases