'रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी मनसोपचार तज्ज्ञांची गरज'

वाढत्या रुग्णसंख्येविषयी एकनाथ शिंदेंनी केली डॉक्टरांशी चर्चा
Corona patients
Corona patientsFile Photo

मुंबई : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील मृत्यूदरात वाढ झाली असून हा वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यातच या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे पालिकेच्या सभागृहात एका खास व्हीसीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाणे शहरातील कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा करुन याबाबत नक्की काय करता येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मृत्यूदरात वाढ झाली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत असंख्य जणांचा मृत्यू झाला. केवळ ज्येष्ठच नव्हे तर अनेक तरुणांनादेखील प्राण गमवावे लागले. त्यामुळेच वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी व योग्यत्या उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

'राज्यात ऑक्सिजनचा आणि रेमेडिसिवीर इजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाल्यास अनेक जीव वाचू शकतील. त्यासोबतच खाजगी रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन मिळाला तर ऐनवेळी रुग्णांना हलवण्याची वेळ येणार नाही', असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

त्यातच बऱ्याचदा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाल्यावर ते मानसिकरित्या खचल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या धक्क्यामुळे त्यांचं निधन लवकर होत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं आहे. म्हणूनच रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याची यावेळी सांगण्यात आलं. ठाणे ग्लोबल कोविड सेंटरमध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे. मात्र, खासगी रुग्णालयात अशी सेवा उपलब्ध नाही. तिथे ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यावर विचार करण्याच्या सूचना शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना केली.

उपचारपद्धतीसोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी अनेक डॉक्टरांनी लावून धरली. याबाबत केंद्राला विशेष विनंती करून राज्याला आपली मार्गदर्शक तत्वे तयार करून वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची परवानगी मिळावी अशी सूचना काही प्रमुख डॉक्टरांनी केली. त्यासोबत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने तत्पूर्वी बहुतांश लोकांचं लसीकरण पूर्ण करून तिसऱ्या लाटेला आळा घालण्यास प्राधान्य द्यावं, असंही या डॉक्टरांनी सुचवलं. यावर ही मागणी योग्यच असून आपण मंत्रिमंडळ बैठकीत ती नक्की मांडू असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.

'दिवसरात्र काम करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याला उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली जाणार नाही', असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच आवाहन त्यांनी या डॉक्टरांना केलं. यावर कोरोनाच्या गंभीर समस्येतून आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास सगळ्यांनी मिळून व्यक्त केला.

संपादन : शर्वरी जोशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com