अधिक काळजी घ्या, मुंबईत गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या रुग्णांची संख्या वाढतेय

मिलिंद तांबे
Friday, 27 November 2020

अनलॉकनंतर मुंबईत येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली असून त्यात गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

मुंबई, ता. 27 : अनलॉकनंतर मुंबईत येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली असून त्यात गुजरात आणि राजस्थानमधून आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. यात 55 वर्षांवरील रुग्ण संख्येने अधिक आहेत. अशा रूग्णांमधील दीर्घकालीन आजार तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन टास्क फोर्सने केले आहे. 

मुंबईत परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक रूग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे. एका पालिका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार बहुतेक रुग्ण हे राजस्थान आणि गुजरातमधून आले आहेत. इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील रुग्णांचा आकडाही अधिक आहे. म्हणूनच, महानगरपालिकेनं विविध रेल्वे स्थानकांवर वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या लोकांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. 

महत्त्वाची बातमी : कोरोनाची लस आल्यावर नागरिकांना देण्याचा प्राधान्यक्रम कसा राहील ? स्वतः राजेश टोपे यांनी दिली माहिती

शहरात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने पालिका प्रशासन देखील सावध झाले आहे. रूग्णवाढ थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील टास्क फोर्सनं 55 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या उच्च जोखमीच्या रुग्णांना कोरोना संसर्गाची लक्षणं हलक्यात न घेण्याचा सल्ला दिला आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले लोक उच्च जोखीम प्रकारात येतात. मात्र लक्षणं असलेले लोकं वेळेवर उपचार घेत नाहीत त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांकडे जाण्यास उशीर करतात ही मोठी चिंतेची बाब असल्याचे ही टास्क फोर्सचे म्हणणे आहे.

कोरोना साथ येऊनये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने रूग्णांना शोधून काढणे, उच्च जोखीम ओळखणे आणि मनुष्यबळ जपणे या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. यात रूग्णांना शोधणं हा सर्वात महत्वाचा भाग असल्याने आरटी-पीसीआर चाचणीत वाढ करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी :  "तुम्ही व्हिलनची भूमिका निभावली म्हणूनच मी हिरो बनू शकले"; न्यायालयाच्या निकालांनंतर कंगनाची प्रतिक्रिया

पालिकेने विविध रूग्णालये तसेच कोविड केंद्रात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करून रूग्णांना तपासणे सुरू केले आहे. त्यासह लॉकडाऊननंतर आपल्या बंद घरांमध्ये परतलेल्या लोकांची तपासणी ही पालिकेने सुरू केली आहे. त्यासह दिवाळीनंतर मुंबईतील चाचण्यांची संख्या ही वाढवली आहे. दरम्यान, सरकारच्या नवीन प्रवासी नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे, रेल्वे स्थानके, राज्यांच्या सीमा तसेच विमानतळांवर मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

count of covid patients coming from gujrath and rajasthan is increasing says task force


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: count of covid patients coming from gujrath and rajasthan is increasing says task force