"आपात्कालीन परिस्थितीत संरक्षण दलाच्या जवानांना कामाचे आदेश द्या"

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

जेंव्हा जेंव्हा कोणतेही संकट आले किंवा ओढावले तेंव्हा तेंव्हा नागरिक संरक्षण दलाच्या जवानांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश मिळत होते

उल्हासनगर - देशात, राज्यात तसेच ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावचे संकट ओढावले आहे. अशात नागरिक संरक्षण दलाच्या जवानांनी आपत्कालीन सेवांचे घेतलेले प्रशिक्षण सार्थकी लावण्यासाठी त्यांना काम करण्याचे आदेश द्यावेत, आमच्याकडेही जुनी खाकी वर्दी असून ती अद्यापही शाबूत ठेवलेली आहे. अशी हाक उल्हासनगरातील राष्ट्रपतीपदक विजेत्या जवानाने राज्य शासनाला  दिली आहे.

या जवानाचे नाव शाम गांगुर्डे आहे. 2002 साली नागरिक संरक्षण दलाच्या वतीने बॉम्ब विल्हेवाट, अग्निशमन, इमारत कोसळल्यास, प्रथमोपचार, मृतदेह उचलणे, पूरपरिस्थितीत काम करणे, आपात्कालीन प्रसंगी शासनाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या सामानाचे वाटप करणे आदी 12 सेवांचे प्रशिक्षण गांगुर्डे यांनी पूर्ण केलेले आहे. 2005 मध्ये आलेल्या महापुरात शाम गांगुर्डे यांनी शेकडोंच्या संख्येने नागरिकांना बाहेर काढून त्यांना जीवनदान दिले होते. तेंव्हा गांगुर्डे यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित झालेले तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी गांगुर्डे यांची पाठ थोपटली होती.त्यावेळी शाम गांगुर्डे यांना राष्ट्रपती जीवन रक्षा पदक, 30 हजार रुपये रोख असा पुरस्कार मिळाला होता.

मोठी बातमी -  मुंबईत लष्कर दाखल झाल्याची पसरवली अफवा; पोलिस आले बेड्या घेऊन आणि...

जेंव्हा जेंव्हा कोणतेही संकट आले किंवा ओढावले तेंव्हा तेंव्हा नागरिक संरक्षण दलाच्या जवानांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश मिळत होते. जवान पोलिसांसोबत काम करत होते. त्याबदल्यात सन्मानपूर्वक मानधन  देण्यात येत होते.याघडीला कोरोनाची धास्ती वाढली आहे. ही मोठी आपात्कालीन परिस्थिती असून त्यासाठी याबाबत अनभिज्ञ असलेल्या शासकीय कर्मचारी, शिक्षक यांना प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. पण ज्यांना 12 आपात्कालीन सेवेच्या प्रशिक्षणाचा अनुभव आहे. ते पाहता त्यांना काम करण्याचे आदेश मिळावेत अशी अपेक्षा शाम गांगुर्डे यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली आहे.

मोठी बातमी - मुंबईतील वरळी कोळीवाडा केला सील, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

ठाणे जिल्ह्यात 40 हजार प्रशिक्षणार्थी

विद्यमान आमदार संजय केळकर हे 15-16 वर्षापूर्वी नागरिक संरक्षण दलाचे ठाणे जिल्हा प्रमुख होते. त्यांच्या काळात जिल्ह्यातील 40 हजार नागरिक संरक्षण दलाच्या जवानांना प्रशिक्षण देण्यात आले होते. राज्यात जवानांची संख्या विक्रमी आहे. आपात्कालीन परिस्थितीच्या वेळी याच जवानांनी जीवाची बाजी लावत लावत कर्तव्य बजावलेले आहे. स्वातंत्र्यानंतर केंद्र शासनाने नागरिक संरक्षण दलाची स्थापना केली. राज्य शासनाचे विशेष गृह खाते हे दल हाताळत होते. मात्र 5-6 वर्षापासुन दलाचे काम थांबलेले आहे. ते सुरू करण्यासाठी विधिमंडळाचे लक्ष वेधले आहे. इतर बहुतांश राज्यात कोरोना आपात्कालीन परिस्थितीत हे दल सक्रिय आहे. कोरोनात राज्य शासनाने नागरिक संरक्षण दलाला कामाचे आदेश देणे ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे.

covid 10 corona virus crisis sanjay kelwars special request to maharashtra government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 10 corona virus crisis sanjay kelwars special request to maharashtra government