कसं होणार MissionBeginAgain? निम्म्यांहून जास्त मुंबई कंटेन्मेंट झोनमध्ये 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

महिन्याभरापूर्वी हळूहळू झालेल्या अनलॉकनंतर मुंबईतले नागरिक अधिक विश्रांतीची अपेक्षा करताहेत. मात्र दुर्देवानं, मुंबईतील जवळजवळ निम्म्यांहून अधिक लोकं हे कंटेन्मेंमेंट झोन (सीझेड) किंवा सीलबंद इमारतींमध्ये राहत आहेत.

 

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबई शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. सोमवारी मुंबईत दिवसभरात 1247  नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसभरात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ असलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर महिन्याभरापूर्वी हळूहळू झालेल्या अनलॉकनंतर मुंबईतले नागरिक अधिक विश्रांतीची अपेक्षा करताहेत. मात्र दुर्देवानं, मुंबईतील जवळजवळ निम्म्यांहून अधिक लोकं हे कंटेन्मेंमेंट झोन (सीझेड) किंवा सीलबंद इमारतींमध्ये राहत आहेत.

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, 1.24 कोटी लोकांपैकी 61.7 लाख लोक सीलबंद भागात राहतात, जिथे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या कार्याला परवानगी नाही. वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेन्मेंमेंट झोन असलेल्या भागात केवळ किराणा आणि वैद्यकीय दुकानांनाच परवानगी आहे. तसेच ज्या इमारतींमध्ये एक जरी मजला सील असेल अशा ठिकाणीही दुकानं आणि कार्यालये उघडता येणार नाहीत.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, कंटेन्मेंमेंट झोनची संख्या बहुतेक झोपडपट्ट्यांमध्ये आहे. गेल्या एका महिन्यापासून त्यात फारसे बदल झाले नाहीत. ताज्या अहवालानुसार, शहरात 726 सक्रिय कंटेन्मेंमेंट झोन असून ज्यात 10.9 लाख घरे आहेत. शहरातील सुमारे 47.1 लाख लोक या भागात राहतात. ज्यात भांडुप, मानखुर्द, गोवंडी आणि कुर्लाचा समावेश आहे. भांडुपमध्ये सक्रिय घटनांची संख्या वाढत असताना, कुर्ला भागात कमी कल दर्शवण्यात आला आहे, कारण या भागातल्या बर्‍याच झोपडपट्ट्या गेल्या महिन्यापासून सील करण्यात आल्यात.

ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

त्याचबरोबर सीलबंद इमारतींची संख्या दुप्पट झाली असून सध्या 5,831 परिसर सीलबंद आहेत. यात एकूण 3.6 लाख कुटुंबांचा समावेश आहे. जिथे 14.6 लाख लोक राहतात. ज्या इमारतीच्या मजल्यावर पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्या नसतील ते रहिवासी बाहेर जाऊ शकतात. मात्र आवारात व्यावसायिक वावर करण्यास परवानगी नाही.

पॉझिटिव्ह प्रकरणांची माहिती मिळाल्यानंतर बर्‍याच इमारती पूर्णपणे सील करण्यात आल्यात. इमारतींमध्ये कोविड-19 प्रकरणांची संख्या वाढत असल्याने, या सीलबंद भागांच्या आसपास असलेल्या लोकांची संख्याही वाढत असल्याचं पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. बोरिवलीमध्ये जास्तीत जास्त सीलबंद इमारती आहेत. अंधेरी, विलेपार्ले, वडाळा आणि मालाडमध्येही सीलबंद इमारतींची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या महिन्यात (31 मे रोजी 785 पासून ते 28 जून रोजी 2,441) मुलुंडमध्ये कंटेन्मेंमेंट झोन आणि सीलबंद इमारतींचे प्रमाणही तीन पटीनं वाढलं आहे.

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

कार्यकर्ते निखिल देसाई म्हणाले, 1 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की यापुढे लॉकडाऊन होणार नाही. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 20 जूनला माध्यमांना सांगितले की, 15 जुलैपर्यंत शहर मोकळा श्वास घेण्यास सहज सक्षम असेल. जेव्हा दररोज नव्या प्रकरणांची संख्या 100-200 पर्यंत खाली येण्याची शक्यता असते. मग 31 जुलै पर्यंत हे नवीन लॉकडाउन काय आहे?, असं सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 half of mumbais population is living in containment zones