esakal | मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालकांची संख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालकांची संख्या घटली

मुंबईत राहणारे रिक्षा, टॅक्सी चालक व मालक आपल्या राज्यात परतत आहेत.

मुंबईतील रिक्षा-टॅक्सीचालकांची संख्या घटली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्तर प्रदेशमध्ये १५ एप्रिलपासून मे महिन्यापर्यंत टप्याटप्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालक व मालक आपल्या राज्यात परतत आहेत. त्याचसोबत सध्या सर्वत्र कोरोनाचं सावट असल्यामुळे भीतीपोटी अनेक रिक्षा, टॅक्सी चालकांनी गावाकडची वाट धरली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचं संकट संपेतपर्यंत पुन्हा मुंबईत येण्याची इच्छा नसल्याचं रिक्षाचालक सुभाषचंद्र गुप्ता यांनी सांगितलं. मुलुंडला राहत असलेले सुभाषचंद्र गुप्ता सध्या त्यांच्या गावी युपीमध्ये गेले आहेत.

राज्य सरकारने राज्यात सोमवारपासून ब्रेक दि चेन अंतर्गत कडक निर्बंध लावले आहे. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या परप्रांतीयांमध्ये लॉकडाउनची भीती पुन्हा निर्माण झाली आहे. यापूर्वी झालेल्या लॉकडाऊनमध्ये रिक्षा, टॅक्सी चालक, मालक आपल्या वाहनांसह आपल्या राज्यात पोहचले होते. तर अनेकांनी पायी-पायी आपले गाव गाठले होते. मात्र, त्यातील अद्याप ३० टक्यांपेक्षा जास्त रिक्षा, टॅक्सी चालक अद्यापही मुंबईत पोहोचले नाहीत. त्यातच, पुन्हा लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आता राहिलेले परप्रांतीय आणि अनलॉक नंतर मुंबईत परतणारे सुद्धा आता आपल्या गावी परतीच्या मार्गावर निघाले आहे.

हेही वाचा : लोकलच्या वेळापत्रकाबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची  माहिती 

घरचे लग्न, निवडणूक आणि लॉकडाऊनची भीती या तीन कारणांमुळे परप्रांतीय यूपीला परत निघाले आहे. त्यामुळे जवळपास १ लाख पेक्षा जास्त लोकांनी उत्तर प्रदेशात आपल्या गावीच मुक्काम ठोकला आहे. सध्या ३००  रुपये मिळविण्यासाठी १२ तास लागते आहे. मात्र, कोरोनापूर्वी ८ तासात सुमारे ७०० रुपयांची कमाई व्हायची, तर सीएनजीचा खर्च काढूनही सुमारे ४०० रुपये शिल्लक राहत होते. मुंबईच्या पर्यटनासाठी किंवा कोणत्याही कामानिमित्ताने बाहेर गावावरून येणाऱ्याच्या भरोश्यावर टॅक्सी, रिक्षाचा व्यवसाय होता. मात्र, कोरोनामुळे आता रस्त्यावर प्रवासी नसल्याने अनलॉक नंतर पुन्हा मुंबईत गेलेले परप्रांतीय सुद्धा उत्तर प्रदेशात पुन्हा परतल्याचं सुभाषचंद गुप्ता यांनी सांगितलं.

रिकॅलिब्रेशनला सुद्धा फटका

५० टक्यांपेक्षा जास्त उत्तर प्रदेशात राहणारे टॅक्सी, रिक्षा चालक, मालक आपल्या राज्यात परतल्याने भाडेवाढीसाठी करण्यात येणाऱ्या मीटर रिकॅलिब्रेशनवर परिणाम होणार आहे. काहींनी आपल्या गाड्या रेल्वेच्या पार्किंगमध्ये लावल्या आहे. तर, अनेक जण गाड्यांसह आपले राज्य गाठले आहे. त्यामुळे रिकॅलिब्रेशनसाठी वाहने नसल्याने भविष्यात परिवहन विभागाला रिकॅलिब्रेशनची वेळ वाढवून देण्याची वेळ येणार आहे.

संपादन - शर्वरी जोशी
 

loading image