esakal | कोविड 19 जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पथक; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं स्पष्टीकरण.. 
sakal

बोलून बातमी शोधा

covid waste

कोविड 19 संबंधीत जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी राज्यभरात तीस सामायिक वैद्यकीय कचरा प्रक्रिया केन्द्र तयार करण्यात आले आहेत

कोविड 19 जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पथक; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं स्पष्टीकरण.. 

sakal_logo
By
सुनीता महामुणकर

मुंबई :  कोविड 19 संबंधीत जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी राज्यभरात तीस सामायिक वैद्यकीय कचरा प्रक्रिया केन्द्र तयार करण्यात आले आहेत, आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच रासायनिक प्रक्रिया केल्यावर कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट केली जाते, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये कोविड19 कचर्याबाबत एकूण 30 सामायिक रासायनिक  प्रक्रिया केन्द्र तयार करण्यात आली आहेत. कोविड 19 कचरा आणि अन्य कचरा असे वर्गीकरण करण्यात आले असून कोविड कचऱ्यासाठी स्वतंत्र आणि शास्त्रिय पद्धतीने विल्हेवाट केली जाते. रुग्णालय, विलगीकरण कक्ष, क्वारंटाईन केन्द्र आदी ठिकाणांहून हा कचरा जमा करण्यात येतो. 

हेही वाचा: कौतुकास्पद! भाटिया रुग्णालयातील तब्बल 'इतक्या ' कोरोनामुक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केला प्लाझ्मा दान..

त्यानंतर प्रक्रिया केन्द्रामध्ये त्यावर रासायनिक विघटन केले जाते आणि मग निर्धारित क्षेपणभूमीवर जमिनीत खोलवर शास्त्रीय पद्धतीने कचरा जमा केला जातो, असे स्पष्ट केले आहे. राज्यातील 82 टक्के प्रशासनांनी कोविड19 कचरा जमा करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहेत, आणि दर दिवशी त्याचे अपडेट्स प्रसिद्ध केले जातात,अशी माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मंडळाचे विभागीय अधिकारी शंभर वाघमारे यांनी प्रतिज्ञापत्र केले आहे.

कल्याणमधील आधारवाडी क्षेपणभूमीवर कोणतीही शास्त्रीय  प्रक्रिया न करता जैव वैद्यकीय कचरा टाकला जात आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका डोंबिवलीमधील स्थानिक रहिवासी किशोर साहनी यांनी एड साधना कुमार यांच्यामार्फत केली आहे. मंगळवारी मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या अनुजा प्रभू देसाई यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर व्हिडीओ कौन्फरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. 

न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून मंडळ आणि स्थानिक प्रशासनाला खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. कोविड 19 साथीमध्ये असे प्रकार चिंताजनक आहेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. कोणतीही जैविक प्रक्रिया न करता कोविड 19 संबंधित कचरा उघड्यावर टाकला जातो, या कचर्यावर विघटनात्मक प्रक्रिया आवश्यक आहे, मात्र तसे होत नाही, असा दावा  याचिकेत केला आहे. 

हेही वाचा: अरे वाह! मुंबईच्या 'या' ठिकाणाला मिळणार अटलबिहारी वाजपेयींचं नाव; उर्वरित विस्तारही होणार वेगात

वाघमारे आणि अन्य पालिका अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. येथे कोविड 19 वैद्यकीय कचरा टाकला जात नाही. त्याऐवजी उंम्बरडे या ठिकाणी स्वतंत्र प्रकल्पामध्ये शास्त्रीय प्रक्रिया करून आणि पूर्ण काळजी घेऊन वैद्यकीय कचरा टाकला जातो, असे म्हटले आहे. कचरा जमा केल्यानंतर सामायिक प्रक्रिया केन्द्रात त्यावर प्रक्रिया करून शास्त्रीय प्रकारे विल्हेवाट लावली जाते, अशी हमीही देण्यात आली आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

covid 19 Waste disposal will done by special team