महालक्ष्मीतील कोव्हिड सेंटर रुग्णांविना धूळ खात; कोट्यवधीचा खर्च अन् एकाही रुग्णाची भरती नाही

भाग्यश्री भुवड
Monday, 2 November 2020

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडू नये यासाठी मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आली आहेत.

मुंबई: कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडू नये यासाठी मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आली आहेत. महालक्ष्मी येथेही 900 खाटांचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले; मात्र तेथे सात महिन्यांत एकाही रुग्णावर उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले महालक्ष्मी येथील जम्बो कोव्हिड सेंटर वापराविना पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध

वरळी, प्रभादेवी, जिजामाता नगर, आदर्शनगर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. या भागात रोज वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली होती. कोरोनाबाधितांवर वेळीच उपचार करता यावेत, यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स येथे मार्चमध्ये जम्बो कोव्हिड सेंटर उभारले. या सेंटरमध्ये 900 खाटा उपलब्ध आहेत. 200 ऑक्‍सिजन खाटा आरक्षित ठेवल्या आहेत; परंतु मार्चपासून या सेंटरमध्ये एकाही कोरोनाबाधितावर उपचार न झाल्याने हे जम्बो कोव्हिड सेंटर उभारलेच का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम

कोरोना संशयित रुग्णांवर वेळीच उपचार करता यावेत, यासाठी गोरेगाव, दहिसर, मुलुंड, बीकेसी, वरळी व महालक्ष्मी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले. त्यात महालक्ष्मी रेसकोर्स येथील जम्बो कोव्हिड सेंटर उभारून सात महिने होत आले; पण एकाही रुग्णावर आतापर्यंत उपचार न झाल्याने कोव्हिड सेंटर उभारण्यात भ्रष्टाचार झाला का, असा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. 

 

वरळी, प्रभादेवी भागात जून, जुलैमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. त्यानंतर आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले; परंतु रुग्णसंख्या वाढेल या अनुषंगाने महालक्ष्मी येथे जम्बो कोव्हिड सेंटर उभारले आहे. गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढवण्याची शक्‍यता लक्षात घेता हे जम्बो कोव्हिड सेंटर सज्ज ठेवले आहे. विशेष म्हणजे हे जम्बो सेंटर नमन डेव्हलपरने दान केले आहे. 
- डॉ. कुमार डुसा,
अधिष्ठाता, महालक्ष्मी रेसकोर्स  

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Center in Mahalakshmi without patients, crore of rupees are spent