ठाण्यात लवकरच एक हजार बेड्सचे कोव्हिड रुग्णालय; 'या' ठिकाणी होणार उभारणी

ठाण्यात लवकरच एक हजार बेड्सचे कोव्हिड रुग्णालय; 'या' ठिकाणी होणार उभारणी
ठाण्यात लवकरच एक हजार बेड्सचे कोव्हिड रुग्णालय; 'या' ठिकाणी होणार उभारणी

ठाणे : ठाण्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करून मास स्क्रिनिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देतानाच तपासण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले. 

बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील रुग्णालयाच्या धर्तीवर पोखरण रोड क्रमांक 2 येथील व्होल्टास कंपनीतील मोकळ्या जागेवरही एक हजार बेड्सचे आणखी एक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ठाणे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री शिंदे यांनी पालिका प्रशासनासमवेत कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली क्वारंटाईन सेंटर्स, तसेच कोव्हिड रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉयज व अन्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये, यासाठी त्यांना वाढीव मानधन देण्याची सूचना शिंदे यांनी केली. कोरोनाविरोधातील लढाईत हे सर्व कर्मचारी आघाडीवर राहून स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

कोरोनाविरोधातील लढाईत आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. गेल्या तीन-सव्वा तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे आपण हजारो लोकांना करोनाची बाधा होण्यापासून वाचवले. तसेच, अनेकांचे प्राणही वाचवण्यात आपल्याला यश आले. कोरोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे या लढाईला सामोरे जावे लागेल, असे सांगून यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.

सिडकोच्या माध्यमातून ठाण्यात रुग्णालय
पोखरण क्रमांक 2 येथील व्होल्टास कंपनीच्या जागेवर सिडकोच्या माध्यमातून एक हजार बेड्सचे कोव्हिड रुग्णालय उभारण्याची घोषणाही शिंदे यांनी केली. आयुक्त डॉ. शर्मा यांच्यासह त्यांनी कंपनीच्या जागेची पाहणीही केली. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या धर्तीवरच या नव्या रुग्णालयातही ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स, आयसीयू, डायलिसिस केंद्र, रेडिओलॉजी विभाग, पॅथॉलॉजी आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या वेळी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com