गोयल मुंबईद्रोही असल्याचा भाकपचा आरोप; महिलांना लोकल प्रवास नाकारल्याने गंभीर प्रतिक्रिया 

प्रशांत कांबळे
Saturday, 17 October 2020

मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्‍सप्रेस सुरू करण्यासाठी स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गोयल यांनी तसे ट्विटसुद्धा केले आहे.

मुंबई ः मुंबई ते अहमदाबाद खासगी तेजस एक्‍सप्रेस सुरू करण्यासाठी स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी गोयल यांनी तसे ट्विटसुद्धा केले आहे. मात्र, राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय महिलांना लोकलची सुविधा देता येणार नसल्याचे रेल्वेने राज्य सरकारला कळवले आहे. त्याबाबत गंभीर प्रतिक्रिया व्यक्त होत असून पियुष गोयल मुंबईद्रोही असल्याची टीका भाकपचे सरचिटणीस कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी केली आहे. 

शिवडी न्यायालयात एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; जखमी झाल्याने केईएम रुग्णालयात दाखल

राज्य सरकारने 17 ऑक्‍टोबरपासून मुंबई लोकलमध्ये महिलांना दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत व रात्री 7 वाजल्यानंतर प्रवासाची परवानगी द्या, असे पत्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वेला पाठवले होते. त्यावर पूर्व नियोजन आणि रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय लोकल सुरू करण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले होते. त्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद जाणारी खासगी तेजस एक्‍सप्रेस 17 ऑक्‍टोबरपासूनच सुरू करणार असल्याचे गोयल यांनी ट्विट करून जाहीर केले आहे. 

गोयल यांचे हे कृत्य मुंबईतील नोकरदार कष्टकरी वर्गाच्या विरोधाचे आहे. महाराष्ट्र सरकारच्या विरोधाचे आहे. मुंबईत कामावर जाण्यासाठी प्रवाशांना चार चार तास प्रवास करावा लागतो. अतिरिक्त पैसेही खर्च करावे लागतात. जर तेजस एक्‍सप्रेस जर चालू होते, मेट्रो चालू होते तर महिलांसाठी लोकल का सुरू करता येत नाही? याचाच अर्थ पियुष गोयल हे खासगीकरणासाठी काम करत आहेत व राज्य सरकारची जाणूनबुजून अडवणूक करत आहेत, असा आरोप भाकपने केला आहे. राज्य सरकारची सूचना मान्य करून महिलांसाठी लोकल तात्काळ सुरू करण्याची मागणीही भाकपने केली आहे.

------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CPI accuses Goyal of being anti-Mumbai Serious reactions to women being denied local travel