शिवडी न्यायालयात एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; जखमी झाल्याने केईएम रुग्णालयात दाखल

अनिश पाटील
Saturday, 17 October 2020

शिवडी न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून 34 वर्षीय व्यक्तीने उडी मारून शुक्रवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : शिवडी न्यायालयाच्या चौथ्या मजल्यावरून 34 वर्षीय व्यक्तीने उडी मारून शुक्रवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. राजेंद्र वाल्मिकी असे व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयामध्ये बेल बॉण्ड भरण्यासाठी आला होता. वाल्मिकी गंभीर जखमी असून त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दसऱ्यापर्यंत जीम सुरू होणार? जीम व्यवसायीकांशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री सकारात्मक

गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी वाल्मिकीला 18 ऑगस्टला अटक केली होती. या प्रकरणी वाल्मिकीच्या आणखी सहा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली होती. 16 ऑगस्टला आरोपींनी टेम्पोचालकाला अडवून लुटले होते. टेम्पोमध्ये गुटखा होता. त्यानंतर 18 ऑगस्टला सात आरोपींना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली होती. सर्व आरोपींविरुद्ध गुटखा बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

ठाणे स्मार्ट सिटीच्या अर्धवट प्रकल्पांला ब्रेक; निधी इतर कामांसाठी वापरणार

सर्व सात आरोपींना सप्टेंबर महिन्यातच दहा हजार रुपयांचा जामीन झाला होता. पण पैसे देण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांनी न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला होता. त्याबाबत शुक्रवारी ते न्यायालयासमोर हजर झाले होते. वाल्मिकीची पैशांची व्यवस्था न झाल्यामुळे त्याला आता याप्रकरणी पुन्हा तुरुंगात जावे लागेल, अशी भीती वाटत होती. त्यामुळे त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास करत आहेत. 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: person attempt of a person in Shivdi court KEM hospitalized with injuries