esakal | क्रॉफर्ड दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण
sakal

बोलून बातमी शोधा

क्रॉफर्ड दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता कॅफेसमोर भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहम्मद नईम शेख (60) यांचा मृत्यू झाला. आज बिहार येथील दरभंगा जिल्ह्यातील मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रॉफर्ड दुर्घटना: नईमच्या मृत्यूमुळे कुटुंब निराधार, मृतदेह गावी नेण्यासाठीही होती पैशांची चणचण

sakal_logo
By
दिनेश चिलप मराठे

मुंबईः क्रॉफर्ड मार्केट परिसरातील जनता कॅफेसमोर भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहम्मद नईम शेख (60) यांचा मृत्यू झाला. आज बिहार येथील दरभंगा जिल्ह्यातील मुळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाहनाचा बेदरकार वेग आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे नईम यांचे कुटुंब मात्र उघड्यावर आले आहे. मृतदेह गावी नेण्यासाठीही या कुटुंबाकडे पैसे नव्हते. मित्र आणि नातेवाईकांनी पैसे जमा करुन त्यांचा मृतदेह बिहारला नेला. बिहारमध्ये बरेली कोठी गावचे निवासी असलेले नईम लाखो मजुंराप्रमाणे पोटापाण्यासाठी मुंबईला आले होते. 

कुटुंबामधील ते एकमेव कमावते व्यक्ती होते. जनता कॅफेसमोरील पदपथावर गेल्या कित्येक वर्षांपासून ते बॅगविक्री करायचे. दिवसभर उभे राहून 200 ते 300 रुपये त्यांच्या खिशात पडत. त्यातूनच ते पत्नी अफसरी बेगम, दोन मुली आणि दोन मुलांचे पोट भरायचे. त्यांचा मोठ्या मुलगा आजारी असल्याने दिल्ली येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यासाठी रोजच्या कमाईतून ते पैसे गावी पाठवत असत.  त्यांच्या जाण्याने उदरनिर्वाहासोबतच मुलाच्या उपचाराचाही प्रश्नही आता या कुटुंबासमोर आता उभा ठाकला आहे. 

हेही वाचाः  संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

पदपथावर व्यवसाय करणारे सर्वजण आमच्याकडे चहा पिण्यासाठी येत. नईमही त्यांच्यात असत, असे जनता कॅफेचे शकील कुरेशी सांगतात. अपघातात हॉटेलचे नुकसान झाले त्यापेक्षा कितीतरी निष्पापांचा हकनाक जीव गेला. या गोष्टीचे जास्त वाईट वाटते, असे ते म्हणाले. 

आठवडाभरापूर्वीच मुंबईत

लॉकडाऊनमध्ये हाल होत असल्यानं इतर मजुरांप्रमाणेच नईम शेख देखील आपल्या मुळ गावी बिहारला गेले होते. गेल्या आठवड्यातच ते मुंबईला परतले होते. कोरोनाच्या धक्क्यातून हळूहळू सावरत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. 

अधिक वाचाः कंगनाजी...राम कदमांवर टिप्पणी करत काँग्रेसनं कंगनाला दिला 'हा' सल्ला
  
दैव बलवत्तर म्हणून 'ते' वाचले

अपघात झाला तेव्हा पानटपरी चालक मुश्ताक शेख तेथेच उभे होते. येथे गाडी आदळण्यापूर्वी पदपथावरील काही जण थोड्या वेळापूर्वीच बाजूला गेले होते. अपघात झाल्यानंतर ते बचावकार्यात धावून आले. दैव बलवत्तर म्हणून ते या अपघातातून वाचले, असे मुश्ताक शेख सांगतात.

(संपादनः पूजा विचारे)

Crawford tragedy Naeem death lack money transport bodies village