esakal | 'प्रदीप शर्मांकडे १० कोटी जमा कर', परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Param Bir singh

परमबीर सिंग आणखी गोत्यात, नवीन खळबळजनक आरोप

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्या अडचणी आता आणखी वाढवण्याची शक्यता आहे. क्रिकेट सट्टेबाज सोनू जालान (Cricket bookie Sonu Jalan) याने गुन्हे अन्वेषण विभाग (CID) ला दिलेल्या जबाबात खळबळजनक आरोप केला आहे. "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्याला 'मोठ्या केस'मध्ये अटक नको असेल, तर माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा (pradeep sharma) यांच्याकडे 10 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते." असा मोठा आरोप सोनू जालानने केला आहे. त्याच्या जबाबाविषयी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सोनू जालानची सीआयडीने चौकशी केली. त्यावेळी त्याने परमबीर सिंग यांच्यावर हा आरोप केला. (Cricket bookie Sonu Jalan alleges former Mumbai police chief Param Bir Singh of corruption)

"मोठ्या प्रकरणात अटक टाळायची असेल, तर माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याकडे १० कोटी रुपये जमा कर" असं परमबीर सिंग यांनी आपल्याला सांगितल्याचा आरोप सोनू जालानने केला आहे. सोनू जालानच्या आरोपावर परमबीर सिंग किंवा प्रदीप शर्मा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीआयडी परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करत आहे.

हेही वाचा: आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये

आपल्या आरोपांसंबंधी सोनू जालानने महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर सीआयडीने तपास सुरु केला. बेटींग प्रकरणात मे २०१८ मध्ये अटक झाल्यानंतर आपल्याला परमबीर सिंग यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी ते ठाणे पोलीस आयुक्त होते. ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने सोनू जालानला अटक केली होती.

हेही वाचा: लॉकडाउन कधी उठवणार? राज्याच्या मंत्र्याने दिलं स्पष्ट उत्तर

त्यावेळी परमबीर सिंग यांनी सोनू जालान आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठ्या केस मध्ये अडकवण्याची धमकी दिली होती. दोन महिन्यापूर्वी परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. सचिन वाझे प्रकरणाचा परमबीर सिंग यांना फटका बसला. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. कोर्टात याचिका दाखल केली. परिणामी अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता परमबीर सिंग यांची जुनी प्रकरणे समोर येत असून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत.