esakal | धक्कादायक..! कोरोना संशयितांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये कोरोना संशयितांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना

परदेशवारी करून पनवेलमध्ये परतलेल्या 16 क्रिकेटपटूंना ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे; मात्र हे सर्व क्रिकेटपटू आज दिवसभर भवनाच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

धक्कादायक..! कोरोना संशयितांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : परदेशवारी करून पनवेलमध्ये परतलेल्या 16 क्रिकेटपटूंना ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे; मात्र हे सर्व क्रिकेटपटू आज दिवसभर भवनाच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसून आले. विशेष म्हणजे या वेळी पोलिस बंदोबस्त असतानाही, पोलिसांनी त्यांना रोखण्याऐवजी क्रिकेट खेळू दिले. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ही बातमी वाचली का? ...अन्‌  कोरोनाच्या धास्तीमुळे २० कामगार पळाले!  
 
दुबई येथे क्रिकेट प्रीमियर लिग खेळण्यासाठी गेलेले पनवेल आणि उरणमधील काही खेळाडू शनिवारी (ता. 14) रात्री मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. पालिकेने त्यांना तत्काळ त्याच ठिकाणी ताब्यात घेतले. या सर्वांना विशेष बसने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची कोरोना विषाणूबाबतची चाचण्या करण्यात आली. या चाचणीत त्यांच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली नाहीत; मात्र खबरदारी म्हणून त्यांना खारघरच्या ग्रामविकास भवनात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

ही बातमी वाचली का? कोरोना तपासणीसाठी मुंबईत आणखी दोन प्रयोगशाळा!

खारघरच्या ग्रामविकास भवन येथे या खेळाडूंच्या देखरेखीसाठी कर्मचारी व बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे; मात्र सोमवारी दिवसभर या खेळाडूंपैकी काही जण ग्रामविकास भवनाच्या समोरच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसून आले. परदेशातून आल्याने या खेळाडूंना कोरोनाची लक्षणे काही दिवसांनी जाणवू शकतात. अशा परिस्थितीत इतर व्यक्तींमध्ये मिसळल्यास इतरांना या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले; मात्र हे क्रिकेटपटू सर्रासपणे खेळताना दिसून आल्यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.