मारहाण करणाऱ्या मुलाला घरात राहण्यास मज्जाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मुंबई - व्यवसायाने डॉक्‍टर असलेल्या 72 वर्षांच्या आईला मारहाण करणाऱ्या मुलाला घरात जाण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मज्जाव केला. दक्षिण मुंबईतील उच्च विद्याविभूषित आणि डॉक्‍टर महिलेला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

आईला मारहाण केल्याने तिने मुलाला घरात प्रवेश नाकारला. याविरोधात मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली. "मला आणि माझ्या कुटुंबीयांना घरात घेतले जात नाही, त्यामुळे आम्हाला घरात प्रवेश दिला जावा', असे या याचिकेत म्हटले होते. याचिकेवर न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे सुनावणी झाली. मुलगा गेल्या कित्येक वर्षांपासून आईला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. याचा मानसिक त्रासही त्यांना होत असून, पत्नीच्या सांगण्यावरून तो असे वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

न्या. काथावाला यांनी त्यांची बाजू ग्राह्य मानली व मुलगा व त्याच्या कुटुंबाला घरात येण्यास नकार दिला. ज्याप्रकारे मुलाने आईला त्रास दिल्याचे दिसत आहे, त्यानुसार त्याला घरात येण्यास किंवा मालमत्तेवर काहीही अधिकार नसल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मलबार हिल पोलिसांनी आईला योग्य ते सहकार्य द्यावे, वेळ पडल्यास योग्य ती कारवाई करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले. मुलाने त्याच्या वस्तू घरामधून काढून घ्याव्यात, असेही सांगितले.

Web Title: crime high court