मानवी तस्कर कुलकर्णीवर नागपूरमध्ये खंडणीचा गुन्हा?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - शिफू सन-कृतीचा संस्थापक आणि मानवी तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील कुलकर्णी याच्याविरोधात नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे.

मुंबई - शिफू सन-कृतीचा संस्थापक आणि मानवी तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील कुलकर्णी याच्याविरोधात नागपूर येथील सीताबर्डी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हाही दाखल असल्याचे उजेडात आले आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे.

कुलकर्णीने आपले शिक्षण नागपुरात झाल्याचे सांगितल्यामुळे त्याच्या जबाबाची पडताळणी करण्यासाठी गुन्हे शाखा 9चे पथक मंगळवारी रात्रीच नागपूरला गेले आहे. हे पथक त्याच्या मूळ गावी जाऊन त्याच्याविषयी अधिक माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला न्यायालयाने 3 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुलकर्णीवर दिल्ली, नागपूर आणि पुण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.
तक्रारदारांच्या दोन्ही मुलींचा जबाब आज पोलिस आयुक्तालयात नोंदवण्यात आला. दोन्ही मुलींनी, कुलकर्णी यांनी आमची फसवणूक केलेली नाही;तर ते आम्हाला मदत करत होते, असा जबाब दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशातील एका नावाजलेल्या समाजवादी नेत्याबरोबर आपण अनेक चळवळींत सहभागी झाल्याचे सांगून कुलकर्णी लोकांना जाळ्यात ओढत असे. त्याच्या घरात काही मॉडेलचे फोटोसेशन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याबाबत पोलिस तपास करत आहेत.

मानसोपचार तज्ज्ञ असल्याचा दावा करणाऱ्या कुलकर्णीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यक परिषद, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, महाराष्ट्र परिचर्या परिषद आणि महाराष्ट्र दंत परिषद यांच्याकडेही माहिती मागवली आहे.

कुलकर्णीने आपण नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमधून बीए आणि नागपूर विद्यापीठातून 1991-92 मध्ये क्‍लिनिकल सायकोलॉजीमध्ये पीएचडी केल्याचे सांगितल्यामुळे त्याच्या या दाव्यांबाबत महाविद्यालयातून आणि नागपूर विद्यापीठातून माहिती मागवण्यात आली.

त्यांच्याकडील माहितीत कुलकर्णीची माहिती अजूनतरी सापडत नसल्याने त्यांनी आणखी काही अवधी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: crime on human smuggler kulkarni