
डोंबिवली : दुपारी विवाहितेच्या घरी पोहोचला, हत्या केल्यानंतर स्वत: च पोलीस ठाण्यात गेला
डोंबिवली - अनैतिक प्रेम संबंधातून झालेल्या वादातून 38 वर्षीय तरुणाने विवाहीत 40 वर्षीय महिलेची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. आरोपी संदिप अहिरे (वय 38) याने खून केल्यानंतर स्वतःच मानपाडा पोलीस ठाण्यात हजर होत आपण खून केला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत संदीपला अटक करण्यात आली आहे. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाईपलाईन रोड परिसरातील श्रीहरी चाळ येथे मयत महिला वैशाली मस्तूद या परिवारासह राहतात.
त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या संदीप सोबत त्यांचे अनैतिक संबंध होते. बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान घरी कोणी नसताना संदिप वैशालीच्या घरी आला होता. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने रागाच्या भरात संदीपने ब्लेडने वैशाली यांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये वैशालीचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर संदीप स्वतःच मानपाडा पोलिस ठाण्यात दुपारी 2 च्या सुमारास हजर झाला आणि आपण हत्या केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत संदिप याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली. याचा अधिक तपास मानपाडा पोलिस करत आहेत. संदीप याचे लग्न झालेले नव्हते, तर मयत महिलेला पती व दोन मुले आहेत.