
चावी न दिल्याने झाली डोंबिवलीतील त्या सुरक्षारक्षकाची हत्या
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील विजय पेपर प्रोडक्ट मिल या कंपनीतील सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर गुरुम (वय 64) यांची हत्या झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले होते. त्या दृष्टीने तपास केला असता चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली रिक्षा, त्यावरील बॅनरच्या सहाय्याने मानपाडा पोलिसांनी आठ तासांच्या आत हत्येचा उलगडा करीत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी टोनी थॉमस डिसिल्व्हा उर्फ शिवा सोमा हिलम (वय 30) व संतोष शिर्के (वय 42) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी चोरीचे सामान विक्री केलेला भंगार विक्रेता फिरोज खान (वय 30) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
बंद कंपनीतील सामान चोरीच्या उद्देशाने आलेल्या तिघा चोरट्यांना सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर यांनी विरोध केला. कंपनीच्या ऑफिसचा दरवाजा असलेले लॉक उघडण्यासाठी चोरट्यांनी त्यांच्याकडे चावी मागितली. ती चावी न दिल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात रॉड मारुन त्यांस जीवे ठार मारले. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, चोरी केलेले भंगार पोलिसांनी जप्त केले आहे. एका आरोपीचा अद्याप शोध सुरु असून त्याच्या शोधासाठी एक पथक बदलापूर येथे रवाना झाल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल कुराडे यांनी दिली.
डोंबिवली एमआयडीसी फेज 1 मधील गेल्या काही वर्षापासून बंद असलेल्या विजय पेपर मिल या कंपनीतील सुरक्षा रक्षकाची हत्या झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. कंपनीत काही महिन्यांपूर्वीच ग्यानबहादूर हे सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले होते. ते आपले कर्तव्य बजावित असतानाच बुधवारी सकाळी कंपनीत रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एमआयडीसी परिसरात तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल तारमळे यांच्या पथकाने 8 तासांत हत्येच्या प्रकरणाचा उलगडा केला. घटनास्थळाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. यामध्ये तीन व्यक्ती कंपनीच्या भिंतीवरुन आत शिरल्याचे समोर आले. कंपनीत पाहणी केली असता सुमारे दिड लाखाचे भंगार चोरीला गेल्याची माहिती उघडकीस आली होती. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याचे यामुळे उघड झाले होते. भंगार चोरी केल्यानंतर चोरटे एका रिक्षातून जात असल्याचे सीसीटिव्ही मध्ये आढळून आले होते.
या रिक्षावर असलेल्या एका बॅनरवर पोलिसांचे लक्ष गेले. त्या बॅनरचा शोध पोलिसांनी घेतला त्यातून कल्याण डोंबिवलीतील सर्व रिक्षांची पहाणी सुरु केली. यावेळी एका रिक्षावर फाटलेल्या स्थितीत हा बॅनर दिसून आला. या रिक्षाचा पाठलाग करुन पोलिसांनी रिक्षा अडवली असता चालकाने पोलिसांना पाहताच पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव टोनी थॉमस डिसीव्हा उर्फ शिवा सोमा हिलम असून त्याने दोघांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. या चोरट्यांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील भंगार विक्रेता फिरोज खान याला हे सामान 10 हजार रुपयांना विकले होते. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच टोनी ने दोन्ही साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली असून एक साथीदार संतोष शिर्के याला कल्याण गुन्हे अन्वेशन विभागाने नेतीवली येथून बुधवारी रात्री ताब्यात घेतले आहे. त्याला आज मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
तिघे चोरटे चोरी करण्यासाठी मंगळवारी रात्री कंपनीत शिरले होते. त्यांनी कंपनीच्या भिंतीवरुन उडी मारुन कंपनीत प्रवेश केला. कंपनीच्या ऑफिसचे लॉक तोडत असताना सुरक्षा रक्षक ग्यान बहादूर यास जाग आली. त्याने त्यांना प्रतिकार करीत आरडाओरडा सुरु केला. चोरट्यांनी त्याच्याकडे चावी मागितली असता ती देखील त्याने न दिल्याने त्याच्या डोक्यात रॉडने वार करुन त्यास ठार मारले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
टोनी हा भाड्याने रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत असून हीच रिक्षा त्याने गुन्ह्यात वापरली होती. त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर संतोष हा बस ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या आरोपीचा अद्याप पोलिस शोध घेत असून बदलापूर येथे एक पथक त्यासाठी रवाना झाले आहे.
Web Title: Crime News Murder In Dombivali For Not Giving The Key Police Three Arrested Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..