धक्कादायक! घरात घुसून महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

वसईतील घटना; दोघांवर गुन्हा दाखल 

नालासोपारा - महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या वाढत्या घटनांत वसईतील एका प्रकरणाची भर पडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास दोघा जणांनी घरात घुसून गर्भवती महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. 

हेही वाचा - मंदिराशेजारी वाहत वाहत आले अर्भक  

वसईत पोलिस भरतीबाबत मार्गदर्शन वर्ग घेणारी ही गर्भवती महिला रविवार असल्याने घरातच होती. तिचा पती कामावर गेला होता. दुपारच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी दारावरील बेल वाजवून पती कुठे आहेत, अशी विचारणा या महिलेला केली. पती कामावर गेले असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर ते दोघे तिच्याशीच बोलायचे आहे, असे म्हणाले. क्‍लासला सुट्टी असल्याने सोमवारी या, अशी सूचना तिने केली. त्या वेळी एकाने तिला धक्का देऊन पाडले आणि विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितल्यावरून दुसऱ्याने तिची छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा - दोन हात आणि एका पायाने चित्र काढणारा अवलिया

याबाबत माहिती मिळाल्यानंतर माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला. पोलिस या परिसरातील सीसी टीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारे अनोळखी आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पीडित महिलेच्या तक्रारीवरून आम्ही त्याच दिवशी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीतील आरोपी अनोळखी आहेत. त्यांचा छडा लावण्यासाठी आम्ही सोसायटीच्या परिसरातील सीसी टीव्ही तपासत आहोत. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन घटनेतील सत्य बाहेर काढू. 
- राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माणिकपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal Attempts to rob a woman in a house