कोरोनाच्या धास्तीमुळे सॅनिटायझरचा तुटवडा 

मिलिंद तांबे
गुरुवार, 12 मार्च 2020

कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे सॅनिटायझरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे सर्व प्रकारच्या सॅनिटायझरच्या किमतीमध्ये 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

मुंबई, ता. 11 : कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे सॅनिटायझरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे सर्व प्रकारच्या सॅनिटायझरच्या किमतीमध्ये 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची मागणी नोंदवल्याचे औषध दुकानदारांनी सांगितले. 

महत्वाची बातमी ः दुबईहून आलेल्या एकास सोलापूरला रुग्णालयात हलवले

जगभरातील कोरोना विषाणू संसर्गामुळे दीड महिन्यांपासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या बाधेपासून संरक्षणासाठी नागरिक मास्क आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुनाशकांचा वापर करत आहेत. जंतुनाशक द्रव्य, साबण, तेल, गोळ्या यांची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मुंबईत जंतुनाशकांच्या मागणीत बारापट वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील सॅनिटायझरची मागणी दिवसाला एक लाख बाटल्यांवरून 25 लाख बाटल्यांवर गेली; मात्र दिवसाला फक्त एक लाख बाटल्यांचा पुरवठा होतो. परिणामी सॅनिटायझरच्या किमतींमध्ये 15 ते 20 टक्के वाढ झाल्याचे रिटेल अँड डिस्पेन्सिंग केमिस्ट्‌स असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद दानवे यांनी सांगितले. 

महत्वाची बातमी ः corona-virus:‘अभी मास्क का शॉर्टेज है’, काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री

कोरोना संसर्गामुळे स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यामुळे दीड महिन्यापासून घर ते शाळा-महाविद्यालये, कॉर्पोरेट हाऊस, मॉलमध्ये सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. ही मागणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. बाजारात उपलब्ध असणारे कोणत्याही प्रकारचे सॅनिटायझर नागरिक विकत घेत आहेत. त्यामुळे साधारणत: 60 ते 85 रुपयांना मिळणारे 50 मिली. हॅंड सॅनिटायझर आता 90 ते 125 रुपयांना विकले जात आहे. चीनमधून डिस्पेन्सर पम्प येणे बंद झाल्यामुळे सध्या साध्या बाटल्यांमधील सॅनिटायझर बाजारात आले आहेत. सरकारने सुरू केलेल्या जनजागृतीमुळे सॅनिटायझर विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिनाभरात सॅनिटायझरच्या 20 लाखांहून अधिक बाटल्यांची म्हणजे सुमारे 10 कोटी रुपयांची विक्री झाल्याची माहिती इंडियन फुड अँड ड्रग्ज लायसेन्स होल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली. 

महत्वाची बातमी ः देशातच फिरताय ना? मग कोरोनाचं टेन्शन नको!

नोंदणीनंतर घरपोच पुरवठा 
मुंबईत सुमारे साडेसहा हजार औषध दुकाने आहेत. पूर्वी एका दुकानातून दिवसाला सॅनिटायझरच्या 30 ते 40 बाटल्या विकल्या जात होत्या. ही संख्या आता 400 वर पोहोचली आहे. सॅनिटायझर न मिळालेले ग्राहक मागणी नोंदवून जात आहेत. दुकानात सॅनिटायझरचा साठा आल्यानंतर या ग्राहकाच्या घरी पोहोचवला जात आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून लोकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

महत्वाची बातमी ः कोरोनाच्या धास्तीमुळे मुंबई-पुणे प्रवास मंदावला

बाजारात आयएसओ प्रोफाईल अल्कोहोल आणि इथाईल अल्कोहोल या दोन प्रकारचे सॅनिटायझर मिळतात. गंभीर स्वरूपाच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी इथाईल अल्कोहोल प्रकारचे सॅनिटायझर गरजेचे आहे. या सॅनिटायझरच्या विक्रीसाठी कडक नियम आहेत. याबाबत सरकारने बैठक घेऊन इथाईल अल्कोहोल सॅनिटायझर अधिकाधिक उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. 
- अभय पांडे, अध्यक्ष, इंडियन फूड अँड ड्रग्ज लायसेन्स होल्डर्स असोसिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to corono demand of hand sanitizer