
९३ अब्ज सिगरेटिंचा धूर देशातून यावर्षी निघणार!
मुंबई : कोरोनाचे सावट कमी होत चालल्याने आता पुन्हा लोकांनी सिगरेटिंकडे आपला मोर्चा वळवला असून यावर्षी देशात ९३ अब्ज सिगरेटिंचा धूर निघेल असा अंदाज क्रिसील रेटिंग या संस्थेने व्यक्त केला आहे. मार्च २०२३ पर्यंत देशातील प्रमुख कंपन्यांच्या सिगरेटची विक्री कोरोनापूर्वकाळापेक्षा जास्त होईल असाही त्यांचा अंदाज आहे. कोरोना संपत चालल्याने आता लोक मनमोकळेपणे बाहेर फिरू लागले आहेत, दुकानेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत, तसेच सिगरेटींवरील करही एक दोन वर्ष स्थिर असल्यामुळे सिगरेटिंचा खप वाढेल, असाही क्रिसीलचा अंदाज आहे. या आर्थिक वर्षात मोठ्या कंपन्यांची सिगरेट विक्री पाच ते सहा टक्क्यांनी वाढेल आणि ती कोरोनापूर्व कालखंडाएवढी होईल. २०२० पेक्षा या कंपन्यांची उलाढालही तीन टक्क्यांनी वाढेल. मात्र सिगरेटिंमध्ये वापरला जाणारा तंबाखू आणि त्या भोवतीचे आवरण याच्या खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांचा नफाही एक ते दीड टक्के कमी होईल.
सिगरेटिंचा तंबाखू व सिगरेट कांडीचे पॅकिंग याचा खर्च एकूण खर्चाच्या निम्मा असतो. कोरोनाचा कालखंड सुरू झाल्यावर मार्च २०२१ या आर्थिक वर्षात सिगरेट चा खप १४ टक्के कमी झाला होता. तर कोरोना कमी झाल्यानंतर मार्च २०२२ नंतर या वर्षात तो १४ टक्क्यांनी वाढला. आताही तोच कल कायम असून आता पुन्हा कोरोनापूर्व काळाएवढ्याच सिगरेटची विक्री होईल. सन २०१३ पासून सिगरेटींवरील करही मोठ्या प्रमाणात वाढत होते. त्यामुळे सिगरेट शौकीन हे बिडी किंवा अवैध सिगरेट खरेदी करत होते. मात्र गेली दोन वर्षे करही स्थिर असल्यामुळे आता मोठ्या कंपन्यांच्या सिगरेटचा खप वाढतो आहे. एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिक वरही बंदी आल्यामुळे सिगरेट खोक्याच्या बाह्य पॅकिंगसाठी कंपन्यांना अन्य गोष्टींवर भर द्यावा लागेल. त्यामुळेही त्यांचा खर्च वाढेल असाही क्रिसीलचा अंदाज आहे.
Web Title: Crisil Ratings Smoke Of 93 Billion Cigarettes Mumbai Cigarette Sales Increase This Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..