गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक उपक्रमांवर संकट, कोरोनाचा असाही झालाय परिणाम

भारती बारस्कर
Saturday, 29 August 2020

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देणगी, भक्तांकडून मिळणारे दान या माध्यमातून मोठे उत्पन्न व्हायचे. कोरोना महामारीमुळे यावेळी 70 ते 80 टक्के उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मंडळांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्याशी निगडित असलेल्या मोफत शस्त्रक्रिया, डायलिसीस सेंटर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत या गरजूंना पुरविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मंडळांना आखडता हात घ्यावा लागणार आहे. 

शिवडी (मुंबई) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देणगी, भक्तांकडून मिळणारे दान या माध्यमातून मोठे उत्पन्न व्हायचे. कोरोना महामारीमुळे यावेळी 70 ते 80 टक्के उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मंडळांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्याशी निगडित असलेल्या मोफत शस्त्रक्रिया, डायलिसीस सेंटर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत या गरजूंना पुरविण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मंडळांना आखडता हात घ्यावा लागणार आहे. 

क्लिक करा : 'बबड्याच्या हट्टापायी' शेलारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका; विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

मुंबईतील लालबाग परिसरात नामांकित गणेश मंडळे आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची येथे एकच गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागतेच. परदेशातील पाहुणे देखील राजाचा थाट बघण्यासाठी येतात.

त्यामुळे राजाच्या चरणी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे दान, सोने, चांदीचे दागिने इत्यादी वस्तू जमा होतात. तर जवळच असलेल्या "मुंबईचा राजा' अर्थात गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा तेजुकाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवडीचा राजा यांचा थाट सुद्धा राजा सारखाच असल्याने भाविकांचे पाय आपसूकच दर्शनासाठी मंडपात वळतात. 

हे देखील वाचा : 'बबड्याच्या हट्टापायी' ट्विटनंतर रोहित पवारांचे आशिष शेलारांना जशाच तसे उत्तर

गणेशोत्सवात लालबाग, परळमधील जवळपास सर्वच मंडळांकडे लाखो, कोट्यवधी रुपयांचे दान जमा होते. त्यामुळे येथील मंडळांना वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणे सहज शक्‍य होते. यंदा कोरोना महामारीमुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असल्याने तसेच वर्गणी, देणगी, दान जमा न झाल्याने सर्वच मंडळांच्या तिजोऱ्या खाली आहेत. त्यामुळे मंडळांना यंदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

 

दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सवावर होणारा खर्च यंदा झालेला नाही. बाप्पाची मूर्ती, मंडप, सजावट, आगमन सोहळ्यापासून ते विसर्जनावरील सर्वच खर्च वाचला आहे. मंडळाकडे मागील वर्षाच्या देणगीतील रक्कम जमा असून देणगीदारांना "ऐच्छिक' देणगी देण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे मंडळ यावर्षी वैद्यकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील उपक्रम काटकसरीने राबवणार आहे. 
- वासुदेव सावंत, सचिव, 
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ 

अनाथाश्रम, वृद्धाश्रमात मदत, अन्नदान, वस्त्रदान, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, शालेय वस्तू वाटप, रुग्णालयांना व्हिल चेअर, स्ट्रेचर वाटप आदी उपक्रम "राजा तेजुकाया ट्रस्ट'च्या माध्यमातून करण्यात येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे काहीच मदत मिळू न शकल्याने मंडळाला सामाजिक उपक्रम राबविणे शक्‍य होणार नाही. 
- अवधूत तावडे, अध्यक्ष, 
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव (ट्रस्ट) परळ 

कोरोना महामारीमुळे यंदा मंडळाने वर्गणी गोळा न करता गणेशोत्सवाची 69 वर्षांची परंपरा मोडीत काढत 10 ऐवजी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला. अनावश्‍यक खर्च टाळून दरवर्षीच्या शिल्लक रक्कमेतून सामाजिक शैक्षणिक उपक्रम याही वर्षी राबवण्यात येणार आहेत. या वर्षभरात कोरोनाबाबत जनजागृती कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर असे उपक्रम राबविण्याच्या तयारिकरिता आराखडा मंडळाच्या वतीने तयार करण्यात येत आहे. 
- श्रीकांत जाधव, अध्यक्ष 
शिवडीचा राजा 

'लालबागचा राजा'तर्फे उपक्रम
मंडळाच्या वतीने वाडीतील स्थानिकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्गणी गोळा करण्यात आली आहे. यामुळे येथील वर्गणीदारांचे सभासदत्व अबाधित राहते. ही वर्गणी फारच अल्प स्वरुपाची असते. याचा हातभार उत्सवाला लागतो. यंदा लाखोंच्या संख्यने दर्शनासाठी लालबागमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांची गर्दी नसल्याने देणगीचा भार येथील सर्व मंडळांना सोसावा लागणार आहेच. आमच्या मंडळाने वर्षभराचे सुयोग्य केलेले नियोजन यामुळे सामाजिक उपक्रम राबविणे मंडळाला शक्‍य होणार आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांना मदत, मोफत शस्त्रक्रिया, डायलिसीस सेंटर आणि नैसर्गिक आपत्तीतील मदत यावर परिणाम होणार नाही, असे "लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले. 
-----------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The crisis on the social activities of Ganeshotsav Mandals due to Corona