गंधकामुळे मगरी गुदमरल्या

सावित्री नदीत गंधक पसरले आहे. त्यामुळे मगरी धाेक्यात आहेत.
सावित्री नदीत गंधक पसरले आहे. त्यामुळे मगरी धाेक्यात आहेत.

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर सावित्री नदीकिनारी गेल्या महिन्यात गंधक घेऊन जाणारा ट्रक उलटला होता. त्या वेळी पडलेल्या गंधकाने आज अचानक पेट घेतला. त्यामुळे पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ उडाली. सावित्रीत मगरींचा वावर असल्याने या घटनेमुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ 22 जूनला रात्री 10 च्या सुमारास एक ट्रक उलटला होता. घटनेत दोन जण जखमी होते; तर ट्रकमधील गंधक पावडरही इतरत्र विखुरली होती. ती पावसामुळे नदीत गेली आहे. या घटनेच्या एक महिन्यानंतरही संबंधित ट्रकमालक, कंपनी आणि प्रशासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे गंधकाने अचानक पेट घेतला. 

याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. गंधकाने नदीलादेखील धोका निर्माण झाला आहे; तर मगरींचे अस्तित्वही धोक्‍यात आले आहे. गंधकाबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

रहिवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी महाड एमआयडीसीच्या अग्निशमन पथकाचे बंब मागवले; मात्र पाण्याशी संपर्क आल्याने गंधकाने अधिकच पेट घेतला. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराकडून माती घेऊन ती टाकण्यात आली. यामुळे आग आटोक्‍यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड उपस्थित होते. 

पाळीव जनावरे, सावित्री नदीतील मगरी आणि लहान मुलांना या गंधकाचा धोका होऊ शकतो, हे माहीत असतानाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहनमालक, चालक, वाहतूकदार किंवा प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी "वॉचडॉग फाऊंडेशन'ने केली आहे. मगर संरक्षणाबाबत वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे. 
 
काय होते गंधकामुळे? 
गंधक पाण्याच्या संपर्कात आल्यास सल्फरस ऍसिड तयार करते. त्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. नाक आणि गळ्याला त्रास होऊ शकतो आणि श्वास घेण्यात समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांच्या जळजळीमुळे भविष्यात अंधत्व येऊ शकते. 
 
महाडमधील प्रदूषणाबाबत आम्ही लक्ष देत आहोत. सावित्री नदीत गंधक गेल्यानंतर हवा आणि जलप्रदूषण झाले आहे. प्रदूषण आणि अन्यबाबत प्रत्येक कार्यालयाची जबाबदारी निश्‍चित झाली पाहिजे. 
- डॉ. सुधीर पटवर्धन, पर्यावरणतज्ज्ञ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com