'पीकविमा भरण्यास मुदतवाढ हवी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

खरीप हंगामातील पीकविमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पीकविमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबई - खरीप हंगामातील पीकविमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पीकविमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पीकविम्यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागांत कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा पेरा 50 टक्केही झालेला नाही; तर काही भागांत पेरण्यांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे.

समाधानकारक पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. तसेच, पीककर्जाचे वाटपदेखील 50 टक्‍क्‍यांहून कमी झालेले असल्यामुळे पीकविमा हप्ता भरण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. राज्यातील लाखो शेतकरी अजनूही पीकविम्याचा हप्ता भरण्यापासून वंचित आहेत. जुलै महिनाअखेरीस पीकविमा भरण्याची मुदत संपत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला नाही, हे लक्षात घेऊन त्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून द्यावी; अन्यथा मोठ्या संख्येने शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop Insurance Time increase vijay wadettiwar