अबब! कुत्र्यांच्या नसबंदीसाठी 1 कोटीचा खर्च 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पहिल्या टप्प्यात 30 लाखांच्या खर्चास मंजुरी 

भिवंडी : भिवंडी शहरात भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्याच्या बंदोबस्तासाठी महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कुत्र्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे एका नसबंदीसाठी 1190 रुपये स्वयंसेवी संस्थेस देणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा - बसच्या अपघातात 20 विद्यार्थी जखमी

हे काम बीड येथील "युनिवर्सल एनिमल वेल्फेअर सोसायटी' या संस्थेस दिले असून सुरुवातीला या कामासाठी पहिल्या टप्प्यात 30 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, शहरात एकूण आठ हजार 519 कुत्र्यांची नसबंदी या संस्थेस करावयाची असून त्यासाठी एकूण एक कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे. 

हेही वाचा - कोण होता करीम लाला

भिवंडी शहरात मागील महिन्यात भटक्‍या कुत्र्यांनी अन्सार नगर या परिसरात पाच अल्पवयीन बालकांचा चावा घेतला होता. यात एकाची प्रकृती गंभीर असल्याने शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ही बाब गंभीररीत्या घेत स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य विभागास भटक्‍या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले.

ज्यानंतर बीड येथील "युनिवर्सल ऍनिमल वेल्फेअर सोसायटी' या संस्थेची 1190 रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून, शहरातील एकूण आठ हजार 519 कुत्र्यांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. दरम्यान, पहिल्या टप्प्यात 30 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासनाने मान्यता दिली आहे. 

म्हणून वाढली आहे कुत्र्यांची संख्या 

भिवंडी शहरात मार्च 2011 मध्ये 18,259 भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती, परंतु त्यानंतर हा कार्यक्रम थांबवण्यात आला. त्यातच शहरात मांस व मच्छी विक्रीच्या दुकानातदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या दुकानांची घाणदेखील शहरातच टाकली जात असल्याने भटक्‍या कुत्र्यांना खाद्य सहज उपलब्ध होऊ लागले. ज्यामुळे शहरासोबतच शहरालगतच्या खोणी खाडीपार, शेलार, भिनार, अंजुरफाटा, कारीवली या ग्रामीण भागात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढू लागली. 

web title : crore rupees for sterilization of dogs 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crore rupees for sterilization of dogs