अतिवृष्टीग्रस्तांसाठी क्रॉस कनेक्शन! भाजपची मुख्यमंत्र्यांकडे तर काँग्रेसची नरेंद्र मोदींकडे मागणी

कृष्ण जोशी
Friday, 16 October 2020

राज्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी ही मागणी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंकडे केली.

मुंबई - राज्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी ही मागणी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंकडे केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. एरवी एखाद्या मोठ्या प्रकरणाच्या तपासाची मागणी भाजपतर्फे केंद्राकडे तर काँग्रेसतर्फे राज्य सरकारकडे केली जाते. मात्र आज दोनही पक्षांचे हे क्रॉस कनेक्शन चुकून लागले की मुद्दाम अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली. 

कॉंग्रेस आगामी BMC निवडणूक स्वतंत्र लढणार? पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष बदलण्याचीही सुचना

परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी , अशी मागणी थोरात यांनी केली. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील असेही थोरात म्हणाले.

मुंबई विद्यापिठाच्या आयडॉल अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता; प्रथम वर्षाचे प्रवेश लवकर

फडणवीसांचे ठाकरेंना आर्जव
अतिवृष्टी झाली या त्या भागातील शेतक-यांना तातडीने दिलासा देण्यासाठी तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतक-यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आज केली. विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी नुकताच अतिवृष्टी झालेल्या मराठवाडयातील जिल्ह्यांना भेट देऊन येथील परिस्थितीचे निवेदन सादर केल्याचेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

दरेकर यांनी नुकताच मराठवाडयातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला व शेतक-यांना शासनाकडुन असलेल्या अपेक्षांबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यासंदर्भात दरेकर यांनी केलेले निवेदनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे. यादृष्टीने या निवेदनातील मागण्यांबाबत शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cross connections for overcrowded BJPs demand to the Chief Minister and Congress' demand to Narendra Modi