महावितरणच्या ॲपमुळे ग्राहकही स्मार्ट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

ग्राहकसेवांना माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन या सेवा सुलभ आणि ग्राहकोपयोगी करण्याचा यशस्वी प्रयोग ‘महावितरण’ने मोबाईल ॲपच्या माध्यमातून केला आहे. वीज मीटर रीडिंगपासून त्याची छायाचित्रे काढण्यापर्यंतची सुविधा या ॲप्लिकेशनचा कणा ठरली आहे. शिवाय, मीटर रीडिंग झाल्यानंतरचा एसएमएस, देखभाल दुरुस्तीच्या कामाचा एसएमएस आणि मीटर रीडिंग पाठवण्याची ग्राहकांना दिलेल्या सुविधांचीही मोठी भर पडली आहे. केवळ मोबाईल ॲपवर वीजबिल भरण्यासाठी मर्यादित न राहता अनेक प्रयोगांची जोड या ॲप्लिकेशनमुळे मिळाली आहे. त्यामुळे ‘स्मार्ट’ झालेल्या महावितरणचे ग्राहकही ‘स्मार्ट’ झाले आहेत.

राज्यातील दोन कोटी ७० हजार ग्राहकांच्या मीटर रीडिंगचा डाटा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवण्याच्या प्रयोगाची सुरुवात सप्टेंबर २०१६ मध्ये झाली. मानवी हस्तक्षेप कमी करतानाच मीटर रीडिंगमधील चुका टाळणे आणि ग्राहकांच्या तक्रारी कमी करणे हा मुख्य उद्देश महावितरणने या ॲपचा ठेवला होता. पारंपरिक छायाचित्रे काढण्याची पद्धत मोबाईल ॲप्लिकेशनमुळे बदलली. तसेच मीटर रीडिंगचे भौगोलिक ठिकाणही घेण्याची सुविधा या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आली आहे. सुरुवातीला राज्यातील महावितरणच्या मोजक्‍याच परिमंडळात हे ॲप वापरायला सुरुवात झाली. भांडुप, कल्याण यांसारख्या मुख्य परिमंडळांनंतर इतर ठिकाणच्या परिमंडळात ॲप्लिकेशन वापराची सुरुवात झाली. सध्या राज्यातील १६ परिमंडळात ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईलवर मीटर रीडिंग घेण्यात येते. 
राज्यातील एकूण ग्राहकांपैकी ९५ टक्के ग्राहकांचे मीटर रीडिंग ॲपवर घेतले जाते. ग्राहकांना आपल्या मोबाईल मीटरचे छायाचित्र आता वीजबिलावर पाहता येते. शिवाय मीटर रीडिंग झाल्यानंतर मोबाईलवर एसएमएसही येतो. मोबाईल रीडिंग घेतल्यानंतर ते रीडिंग सर्व्हरला तत्काळ अपलोड होते. राज्यात कोकण, गडचिरोली या भागात नेटवर्कची तांत्रिक अडचण आहे. त्यामुळेच महावितरणने या ठिकाणी ऑफलाईन मीटर रीडिंगचाही पर्याय दिला आहे. कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर मीटर रीडिंग अपलोड करण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. 

राज्यातील सुमारे ८५ लाख ग्राहकांचे मोबाईल क्रमांक मिळवण्यात महावितरणने काही महिन्यांत प्रयत्न केले आहेत. त्यापैकी रहिवासी ग्राहकांचे क्रमांक सर्वाधिक आहेत. विजेच्या बिलाशी संबंधित होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण यामुळे कमी होण्यासाठी एक प्रकारे मदत झाली आहे. ग्राहकांच्या अनेक तक्रारी या फोटो मीटर रीडिंगमुळे कमी होण्यासाठी मदत होत आहे. आपल्या मीटर रीडिंगमुळे अनेक ग्राहकांच्या शंकांचे समाधान होणे शक्‍य झाले आहे. अनेक ठिकाणी मीटर रीडिंग न होता सरासरी वीजबिल, अंदाजे वीजबिल देण्याचे प्रकार या फोटो मीटर रीडिंगमुळे बंद झाले आहेत. 

अनेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध झाल्याने आता देखभाल दुरुस्तीसाठीचे कामही (आऊटेज) आगाऊ एसएमएसद्वारे कळवण्याची सुरुवात महावितरणमार्फत करण्यात आली आहे. महावितरणने ‘आऊटेज’साठी एसएमएस पाठवण्याची सुविधा ॲपमध्येच दिली आहे. मीटर रीडिंग, मोबाईलद्वारे वीजबिल भरणा; तसेच मीटर रीडिंग कळवण्यासाठीचीही सुविधा ॲपवर आहे. बंद दरवाजामुळे मीटर एजन्सीला रीडिंग घेणे शक्‍य झाले नाही, अशा अनेक कारणांमुळे एखाद्या ग्राहकाचे मीटर रीडिंग न झाल्यास महावितरणकडून एसएमएस पाठवण्यात येतो. ग्राहकांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्या मीटरचे छायाचित्र काढून पाठवण्याची सुविधा ॲप्लिकेशनमध्ये आहे. या सुविधांमुळे महावितरणचा ग्राहक स्मार्ट झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Web Title: customer smart by electricity app